नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा १ व २ डिसेंबर रोजी आखण्यात आला आहे. यादरम्यान शहरात कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेचे नियोजनही करण्यात आले. रहाटे कॉलनी, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहेत.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शहारत वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी अधिसूचना जारी केली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज शहरात उपस्थित राहणार आहे.
त्यामुळे वर्धा मार्ग, धंतोली, रहाटे कॉलनी, सिव्हील लाईन्स, रेशीमबाग चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक इत्यादी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाच्या चार मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला यासंदर्भात सहकार्य करावे असे आवाहन चेतना तिडके यांनी केले आहे.