आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांचे मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाईचे निर्देश
नागपूर : प्रतिबंधित नायलॉन, सिंथेटिक मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्री करणा-या दुकानांची तपासणी व त्यावरील कारवाई अधिक कठोर करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी बुधवारी (ता.२९) दिले. तसेच मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.
आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, उपसभापती विक्रम ग्वालबंशी, सदस्य नागेश मानकर, सदस्या विद्या कन्हेरे, भावना लोणारे, उपायुक्त विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह एजी एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नायलॉन मांजा संदर्भात नागपूर शहरात सुरू असलेल्या कार्यवाहीचा यावेळी आरोग्य समिती सभापतींनी आढावा घेतला. यासंदर्भात नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेंद्र महल्ले यांनी सविस्तर माहिती सादर केली. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्यात येत आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पोलिस आणि मनपाच्या उपद्रव शोध पथकाची संयुक्त केंद्रीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे दैनंदिन कारवाई सुरू आहे. याशिवाय मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे झोननिहाय दुकानांची तपासणी करणे सुरूच आहे. नागपूर शहरात आतापर्यंत २८६७ प्लास्टिक पतंग, ५५ नायलॉन मांजा जप्त करून ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाची अजूनही शहरातील बाजार भागांमध्ये विक्री सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे सर्व झोनमध्ये अधिक कठोरपणे ही कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी यावेळी दिले.
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात, नागरिकांना होणारी इजा ही गंभीर बाब असून यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. उड्डाण पूलांवरून वाहतूक करताना मांजामुळे होणा-या घटना घडत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून उड्डाण पूलावर उंचावरून सुरक्षात्मक दृष्टीने तार लावल्यास मांजा वरच अडकला राहिल त्यामुळे अपघात होणार नाही, अशी सूचना यावेळी उपसभापती विक्रम ग्वालबंशी यांनी मांडली. महाराष्ट्र विद्युत विभागाशी समन्वय साधून त्यांच्या सहकार्याने पूलांवर सुरक्षात्मकरित्या तार लावण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी दिले.
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याबाबत सुद्धा यावेळी आरोग्य समितीद्वारे आढावा घेण्यात आला. नागपूर शहरात सध्या ९२ सक्रिय रुग्ण असून यापैकी ३ रुग्ण ओमिक्रॉनचे असल्याचे दिसून आले. तिनही रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचेही निदर्शनास आले. त्यापैकी एकाला सुट्टी देण्यात आली असून दोघे एम्समध्ये दाखल आहेत. मात्र कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त सतर्क राहण्याची गरज असल्याचे यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी सांगितले. लसीकरणासह मास्क हे सुरक्षेचे मोठे साधन असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या धोक्यापासून बचावासाठी मास्क हे अत्यावश्यक असून यासंदर्भात जनजागृतीसह मास्क न लावणा-यांवरील कारवाई सुद्धा कठोर करण्याचे निर्देश यावेळी आरोग्य समिती सभापतींनी दिले. संभाव्य धोका लक्षात घेउन शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. नागपूर शहरातील एम्स सह, मेडिकल, मेयो सह मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज असून मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष रुग्णालय असे पाच रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ओपीडी सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाकडे ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे डॉ. चिलकर यांनी यावेळी सांगितले.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळवून द्या
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासंदर्भात मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आरोग्य समितीद्वारे आढावा घेण्यात आला. आयसीएमआर च्या पोर्टलवर कोव्हिड मृत म्हणून नोंद असलेल्यांपैकी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे ५४५७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. संपूर्ण पडताळीअंती ४०३२ अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात आले. त्यापैकी दोन हजार अर्जांना त्यांच्यामार्फत अंतिम मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी यावेळी दिली. कोव्हिडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या जास्तीत जास्त नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.
राज्य शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावरून कोव्हिड-१९ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाईन अर्ज करायचे असून नागरिकांनी अर्ज करतेवेळी संबंधित कागदपत्रे व मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून अर्जात अतिशय सोपी माहिती सादर करायची आहे.
कोरोनामुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग इन करून मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचे आधार कार्ड, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात), मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोरोनाचे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) यासाठी आवश्यक आहेत. लाभार्थ्यांना कुठलिही अडचण येत असल्यास त्यांनी आपल्या संबंधित झोन कार्यालयात संपर्क साधावा.
मोकाट जनावरे पकडण्यासाठी वाहनांची संख्या वाढवा
नागपूर शहरातील मोकाट जनावरांबाबत विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आरोग्य सभापतींनी आढावा घेतला. शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडे दोन ट्रॅक्टर ट्रॉली असल्याची माहिती नोडल अधिकारी घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली. नागपूर शहरातील नागरिकांना जनावरांमुळे होत असलेल्या समस्यांच्या अनुषंगाने शहरात प्रत्येक झोनमध्ये वाहन असावे अशी सूचना यावेळी सभापतींनी केली.