नागपूर/बाजारगाव : भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघाचा जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प असून, कळमेश्वर तालुक्यातील जंगली भाग लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, हा वाघ सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आलोकर आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याचे वय 5 ते 8 वर्षे असल्याची माहिती आलोकर यांनी दिली. याच वाघाने आठवडाभरापूर्वी पाचनवरी शिवारात एका गाईची शिकार केली होती. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून या घुलीवाला पुलावर वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी याच पुलावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा व त्यापूर्वी हरणाचा मृत्यू झाला होता. या बाबी वन विभागातील अधिकाºयांना माहिती असूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही.