नागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मे रोजी यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. त्यामुळे ज्यांच्याकडे २ हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक २ हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. एका व्यक्तीला दररोज केवळ दहा नोटाच बदलून मिळणार आहेत. परंतु, विविध कारणांमुळे बँका नोटा बदलून देण्यास नकार देत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बँका २ हजारच्या १० नोटा बदलणाऱ्यांकडून केवायसीची मागणी करत आहेत. त्यामुळे अनेकांना समस्या उद्भवत आहेत.यासंदर्भात कॅनरा बँक, एसबीआय, इंडसइंड बँकेच्या ग्राहकांनी तक्रार दिली आहे.
जनतेला २३ मे ते ३० सप्टेंबर या काळात दोन हजारांच्या नोटा बदलाव्या लागणार आहेत. नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकांची नोटा बदलण्यासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता बॅंकांना घ्यावी लागणार आहे. तरीपण, त्या नोटा फारशा नसल्याने पूर्वीसारखी गर्दी होणार नाही, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले असले तरी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.