नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कुठलीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
यापार्श्वभूमीवर आज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या दालनात भाजपचे आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. थेट कुलगुरूंच्या दालनात हे आंदोलन सुरु असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
नागपूर विद्यापीठामध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी काम करतात. ४० कर्मचाऱ्यांना कुठल्याही सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. तसेच त्यांना वेतनही कमी दिले जाते.यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. कुलगुरू चौधरी हे विद्यापीठ शिक्षण मंचाच्या म्हणजे भाजप पक्षाच्या जवळचे असतानाही त्यांच्याविरोधात भाजपने अंदोलन केल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.