स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
नागपूर: देशात संशोधन करण्याच्या खूप संधी आणि क्षमताही आहेत. ज्या प्रदेशात ज्या वस्तूंचे अधिक उत्पादन आहे, त्या उत्पादनांवर संशोधन करून मूल्यवर्धन करण्यास प्राधान्य द्यावे. हाच देशाला आत्मनिर्भर करण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रकुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, डॉ. शर्मा, अनंत घारड, अरुण लखानी, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी उपस्थित होते.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्याल व रुग्णालयाने 2018 ते 2020 हे दशक उच्च संशोधक दशक म्हणून जाहीर केले होते. त्याअंतर्गत द्वितीय व तृतीय पर्वाचे उद्दिष्ट संशोधक पुरस्कार समारंभ रुग्णालयाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले- ज्ञानाचे व कचर्याचे मूल्यवर्धन करून संपत्तीत रुपांतर करणे हे भविष्यासाठी आवश्यक आहे. संशोधन आणि विकासाची देशाला मदत होऊ शकते. आपल्याकडे संशोधकही आहे.
सर्वच क्षेत्रात आवश्यकतेनुसार संशोधन करण्याची गरज आहे. संशोधनासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य या चतु:सूत्रीचा योग्य वापर झाल्यास देशाच्या प्रगतीला चालना मिळून देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल. यासाठी संशोधनाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. विदर्भात कापूस आहे पण संशोधन नाही, कोळसा आहे पण संशोधन नाही, संत्रा आहे पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही. आवश्यकतेनुसार होणार्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ झाला पाहिजे. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. हे संशोधन खाजगी संशोधन संस्थांच्या माध्यमातून व्हावे. संशोधनातून यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याची आवश्यकता नाही. प्रयोग केल्याशिवाय यश मिळत नाही, असेही ना. गडकरी म्हणाले.