साथ रोग नियंत्रणासाठी आढावा बैठक : मनपा रुग्णालयात रक्त तपासणी करण्याचे आवाहन
नागपूर : डेंग्यूचा प्रकोप वाढू नये यासाठी डेंग्यूची लारवी निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनीही जागरुक राहणे गरजेचे आहे. मनपाच्या यंत्रणेने याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश मनपा स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे साथ रोग नियंत्रणासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, झोन सभापती गार्गी चोपरा, लता काडगाये, राजकुमार शाहू, समिता चकोले, माधुरी ठाकरे, अभिरुची राजगिरे, स्थायी समिती सदस्य वंदना भगत, जिशान मुमताज, दिनेश यादव, लखन येरावार, संजय महाजन, निरंजना पाटील, वैशाली रोहणकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी डेंग्यू निवारणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. ते म्हणाले, जनजागृतीसाठी सर्व माध्यमांचा उपयोग यंत्रणेने करावा. प्रत्येक झोनमध्ये ई-रिक्षाच्या माध्यमातून नागरिकांना डेंग्यूची लारवी निर्माण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावयाची याची माहिती द्यावी, पत्रके, रेडिओ जिंगल्स, पथनाट्य, शाळा, महाविद्यालये, समाजमाध्यमे आदी माध्यमातून लोकांपर्यंत जागृतीचा संदेश पोहोचविणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचलेले दिसते तेथे औषधांची फवारणी करावी, टायर, कुलरच्या टाक्या आदी ठिकाणी पाणी साचून राहते. ज्या घरांमध्ये किंवा व्यावसायिक प्रतिष्ठांनांमध्ये असे दिसून येईल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. हत्तीरोग व स्वच्छता विभागाच्या ५०-५० जणांच्या चमूने एकत्रितपणे शहराच्या आऊटर क्षेत्रात फिरून प्रत्येक १५ दिवसांत फवारणी करावी. याकामी औषधी कमी पडणार नाही, याची काळजी विभागाने घ्यावी. प्रत्येक झोन सभापतींनीही या कामी पुढाकार घ्यावा. पुढील सात दिवसांत झोनस्तरावर बैठक घेऊन यंत्रणेला कामी लावावे, असेही ते म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संपर्क शहरातील प्रत्येक घराशी असतो. त्यामुळे जनजागृतीची पत्रके त्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवावी, असेही निर्देश सभापतींनी दिले.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी डेंग्यूविषयक माहितीचे एक पत्रक प्रत्येक सलूनच्या दुकानात लावण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांतून जो गाळ निघतो त्यामध्ये बहुधा रेतीच असते. हा गाळ शहरात ज्या-ज्या ठिकाणी, वस्त्यांमध्ये खड्डे आहेत, खुले भूखंड आहेत त्या ठिकाणी भरावा. जर खड्डेच नसेल तर पाणी साचणार नाही, अशी सूचना केली.
यावेळी हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांकडून सभापती प्रदीप पोहाणे यांनी झोननिहाय आढावा घेतला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही काही सूचना मांडल्या. या सूचनांवर अंमल करण्याचे निर्देशही सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.
मनपाच्या रुग्णालयात करा रक्ततपासणी
डेंग्यूचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्त तपासणीची सोय नागपूर महानगरपालिकेच्या सदर, महाल आणि आय.जी.आर. रुग्णालयात माफक दरात आहे. योग्य निदान आणि दिशाभूल टाळण्यासाठी या रुग्णालयातूनच रक्त तपासणी करण्याचे आवाहन सभापती प्रदीप पोहाणे यांनी केले.
-तर कर्मचाऱ्यांवरही कारवाई
हा प्रश्न आरोग्याशी संबंधित असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कार्य करण्याची इच्छा नसेल त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरीकडे हलवा, असे निर्देश सभापतींनी दिले. कर्तव्यात कसूर करणारे कर्मचारी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिला