Published On : Tue, Apr 24th, 2018

राज्यातील रस्ते निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा – चंद्रकांत पाटील

मुंबई : जगातील इतर देशात रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान व साहित्याचा अभ्यास करून राज्यातील रस्ते निर्मितीमध्ये वापर करावा. जेणेकरून रस्त्यांच्या दुरुस्तीवरील खर्च कमी करून तो निधी इतर विकास कामांसाठी वापरता येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

युनायटेड स्टेट ट्रेड डेव्हलपमेंट एजन्सीच्या वतीने राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित सार्वजनिक खरेदी प्रक्रियेमध्ये मूल्य निश्चिती या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. पाटील म्हणाले की, शासकीय खरेदी करताना मूल्यात्मक दर्जा असलेल्या वस्तूंची खरेदी कोणत्या प्रकारे करता येईल, यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्ते निर्मिती करताना त्याचा दर्जा उत्तम रहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून आणखी पारदर्शकता आणण्यात येणार आहे. याबरोबरच अधिकाऱ्यांनीही रस्ते बांधताना स्वतःच्या नवनवीन कल्पना राबवाव्यात.

अधिक टिकणारे दर्जेदार काम व्हावे, यासाठी चांगले साहित्य खरेदी करणे, हे टिकाऊ साहित्य वापरण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करावा. त्याचा उपयोग आपल्या कामात करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

अमेरिकेचे वाणिज्यदूत एडगर्ड कगन, युनायटेड स्टेट ट्रेड डेव्हलपमेंट एजन्सीचे जागतिक कार्यक्रम संचालक अँड्री लुपो, दक्षिण आशियाचे प्रतिनिधी मेहनाज अन्सारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement