नागपूर : नागपूर शहर पोलिस आजपासून विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील रस्त्यांवर मोठया आवाजात हॉर्न वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनांचे हॉर्न विनाकारण आणि कर्णकर्कश वाजविल्यामुळे वातावरणामध्ये ध्वनिप्रदूषण होऊन मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाहन चालकांमध्ये वाहनांचा हॉर्न वाजविण्याच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी आज नागपुरात ‘नो हॉँकिंग डे’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांनी नागपूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील वाढलेले ध्वनी प्रदूषण यामुळे सतत वाहनांच्या हॉर्न वाजवण्यामुळे होणाऱ्या लक्षणीय उपद्रवावर प्रकाश टाकला. डॉ. सिंगल यांनी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या ध्वनी पातळीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर दिला, ज्याने निवासी क्षेत्रांसाठी 45 डेसिबल आणि व्यावसायिक क्षेत्रांसाठी 55 डेसिबलची मर्यादा निश्चित केली आहे. तथापि, सर्रास हॉर्निंगमुळे आवाजाची पातळी वारंवार या मर्यादा ओलांडत आहे.
पोलीस विभागाकडून शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेषत: रुग्णालये आणि शाळांसारख्या संवेदनशील भागात हॉर्नचा होणाऱ्या सतत वापराकडे पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आहे, असे डॉ. सिंगल म्हणाले. तसेच या मोहिमेअंतर्गत साऊंड सिस्टीम चालविणाऱ्या डीजेविरुद्ध कडक उपाययोजनांचाही समावेश आहे. लॉन आणि लग्नमंडप यांसारख्या ठिकाणी अत्याधिक मोठ्या आवाजात संगीत वाजवून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारे अनेक डीजे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. ध्वनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आलेले डीजेचे उपकरण पोलीस जप्त करतील.ही व्यापक मोहीम ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची असून शहरात शांतता निर्माण करण्याचा पोलिसांचा मानस आहे.