नागपूर : देशभरात आज ६७ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. . या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी नागपूरला येतात. या दिवसाची पार्श्वभूमी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या अनुषंगाने आज सकाळपासूनच दीक्षाभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान दीक्षाभूमीवर सामूहिक बुद्ध वंदनेसह बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.
बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली त्या दीक्षाभूमीला नतमस्तक होऊन त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी सकाळपासूनच याठिकाणी गर्दी करतात.
हे लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचे उपाय करण्यात आले आहे . पोलिसांसह समता सैनिक दलाचे सैनिकही सेवा देत असतात. संविधान चौकातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी अभिवादन केले आहे.