मुंबई : आज देशातील परिस्थिती गंभीर बनली आहेच शिवाय कला साहित्य,संस्कृतीवर सर्वाधिक आघात होत आहेत त्यामुळे शरद पवारसाहेबांनी सांगितलेल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या सेक्युलर विचारधारांना पुढे नेण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शन बैठकीत केले.
आज मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना आमदार हेमंत टकले यांनी वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, आपण सेक्युलर आहोत अंधश्रध्दाविरोधी आहोत हे आपल्या कलेतून दिसलं पाहिजे. तुम्ही घाबरु नका आम्ही तुमच्यासोबत राहून लढा देवू असे सांगतानाच जाणकारांनी, कवींनी, साहित्यिकांनी लिहिते झाले पाहिजे. मानधन, आरक्षण, सवलती हे आपले हक्क आहेत. त्यासाठी लढा दिला पाहिजे परंतु येणाऱ्या निवडणूकांमध्ये आपल्या विचारांचे सरकार यावे यासाठी कलाकारांनी आपल्या विभागामध्ये पक्षाचा प्रचार करावा असे आवाहनही आमदार हेमंत टकले यांनी केले.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी कलाकारांचे मानधन, ग्रामीण घरकुल योजनेत कलाकारांना आरक्षण, एसटी प्रवासात कलाकारांना सवलत, विविध कला महोत्सव पुन्हा सुरु करणे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांचा समावेश असण्याबाबत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, मुंबई विभागाचे अध्यक्ष मनोज व्यवहारे, मुंबई कार्याध्यक्ष श्रीपाद खानोलकर, शाहीर वामन घोरपडे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.