मुंबई : मुंबई हे भारतातील एक असे प्रमुख शहर आहे की जे जगभरातील लोकांना माहित आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ यशस्वी झाला. आता दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करुन मुंबईला देशासह जगभराचे शॉपिंग डेस्टिनेशन बनविले जाईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
मुंबईच्या विविध भागात १२ ते ३१ जानेवारी दरम्यान झालेल्या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचा समारोप नुकताच गेट वे ऑफ इंडिया येथे झाला, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल हा कार्यक्रम जागतिक मंचावर नेऊन खरेदीच्या चाहत्यांसाठी तसेच सांस्कृतिक महोत्सव म्हणून हे एक चांगले व्यासपीठ निर्माण करणे असा आमचा उद्देश आहे. पुढील वर्षी या कार्यक्रमाचे अजून भव्य पद्धतीने आयोजन केले जाईल. हा कार्यक्रम म्हणजे एमटीडीसीच्या सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक असून येत्या काही वर्षांत यापेक्षा आणखी मोठ्या प्रमाणावर आम्ही तो साजरा करू, असे ते म्हणाले.
सांगता समारंभामध्ये तालवाद्य वादक तौफिक कुरेशी आणि त्यांचा बँड मुंबई स्टॅम्प यांनी कला सादर केली. कविता सेठ यांचा सूफी संगीताचा कार्यक्रम झाला. पुणेरी पद्धतीने परंपरागत तालवाद्ये वाजवणाऱ्या मोरया पथकाने कला सादर केली.
नाईट बाजारला मिळाला उत्तम प्रतिसाद
महोत्सवांतर्गत मुंबईतील पहिल्या एमएसएफ (मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल) रात्रबाजार अर्थात फ्ली मार्केट आणि एमएसएफ खाऊ गल्लीसारखे उपक्रम राबविण्यात आले. वरळी सीफेस येथे मध्यरात्रीपर्यंत तर मालाड आणि पवई या उपनगरांमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत हे बाजार खुले राहिले. या प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. वरळीमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त, मालाड भागात १ लाख ३० हजार आणि पवईमध्ये १ लाखापेक्षा जास्त लोकांनी भेट दिली.
महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणच्या मंचांवरून ६५० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साधारण ५० हजार लोकांनी १३ विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. क्रॉफर्ड मार्केट, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टॅन्ड, गोरेगांव, तलावपाळी, ठाणे, जुहू बीच, वाशी रेल्वे स्टेशन, बेलापूर, खारघर आणि कांदिवली अशा ठिकाणांचा समावेश होता.
स्वस्थ आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देत मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल अंतर्गत भारतात द कलर रनचे आयोजन करण्यात आले. द कलर रन ही स्पर्धा हॅप्पीएस्ट फाइव्ह के ऑन द प्लॅनेट या नावानेही प्रसिद्ध आहे. स्वास्थ्य, आनंद आणि अभिरूचीचा मिलाफ मानल्या गेलेल्या या स्पर्धेत आजवर ४० पेक्षा जास्त देशांमधील ६ दशलक्षांहून जास्त धावपटू सहभागी झाले आहेत. मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत या स्पर्धेत मुंबईतील २ हजार पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला.
मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल अधिक दृष्यमान व्हावा यासाठी एमटीडीसीने विविध रिटेल आणि कॉमर्स संस्थांबरोबर सहकार्य केले होते. यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री, फेडरेशन ऑफ हॉटेल अॅन्ड रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडिया, जेम अॅन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन बुलियन अॅन्ड ज्वेलरी असोसिएशन लिमिटेड आणि फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन यांचा समावेश होता. मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल २०१८ च्या शॉपिंग पार्टनर्समध्ये मुंबईतील मॉल्स आणि २ हजारहून अधिक रिटेल चेन्सचा समावेश होता.