नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने २७३.४७ कोटी रुपये उत्पन्नाचा आणि ३६.४२ लाख रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त राजेश मोहिते यांनी गुरुवारी (ता.५) परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर व सदस्यांकडे सादर केला.
याप्रसंगी आयोजित बैठकीला परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, सदस्य नितीन साठवणे, राजेश घोडपागे, नागेश मानकर, सदस्या मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, विशाखा बांते, अर्चना पाठक, परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिंपरुडे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, वाहतूक अधिकारी सुकीर सोनटक्के, केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९च्या कलम ९७ व ९८ नुसार नागपूर महानगरपालिकेचा सन २०१९-२० चा सुधारित व २०२०-२१चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ सादर करण्यात आला. सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २७३.२० कोटी रुपये अपेक्षित आहे. सुरूवातीची अपेक्षित शिल्लक २६.९६ लाख रुपये धरून एकूण अपेक्षित उत्पन्न २७३.४७ कोटी रुपये राहिल. यातील २७३.११ कोटी रुपये खर्च होईल, असे अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या ‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्यूफॅक्चरींग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल’ अंतर्गत करारातील सार्वजनिक वाहतुकीचे १०० टक्के इलेक्ट्रिकवरील बसेसला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मनपातर्फे १०० इलेक्ट्रिक बसेस संदर्भात केंद्र शासनातर्फे मंजुरी प्राप्त झाली. या योजनेंतर्गत स्टँडर्ड बस करिता ५५ लाख रुपये, मिडी बस करिता ४५ लाख रुपये व मिनी बस करिता ३५ लाख रुपये अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे.
वाठोडा येथे इलेक्ट्रिक बस आगार
केंद्र शासनाकडून मिळणा-या अनुदानातून तुर्तास ४० मिडी इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी मांडला आहे. या प्रस्तावास परिवहन समितीने मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या ४० मिडी इलेक्ट्रिक बसेस करिता वाठोडा येथील १०.८० एकर जागेवर सर्व सुविधायुक्त आगार निर्मिती परिवहन समितीच्या विचाराधिन आहे.
भंगार बसेसमधून ई-टॉयलेट
स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरातील प्रवाशांच्या सुविधेकरिता प्रमुख बस थांब्यालगत जुन्या भंगार बसेसमधून महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट निर्मिती विचाराधीन आहे. ई-टॉयलेट करिता दोन बसेस प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांच्या वतीने देण्यात आले आहेत.