Published On : Fri, Feb 16th, 2018

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली विदर्भ, मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

Advertisement

मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विदर्भ आणि मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना जिल्ह्यातील विविध गारपीटग्रस्त भागाला भेट देऊन त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दिला.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील भंडारज येथील गारपीटग्रस्त भागाची आज श्री. रावते यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अभयसिंह मोहिते, तहसिलदार रामेश्वर पुरी आदींसह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

प्रारंभी श्री. रावते यांनी भंडारज येथील गारपीटग्रस्त शेतकरी महेंद्र हरिश्चंद्र शेंडे यांच्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या लिंबू पिकाची पाहणी करुन त्यांना धीर दिला. त्यानंतर गजानन वसंतराव शेंडे यांच्या हरभऱ्याच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

यावेळी श्री. रावते म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील काही तालुक्यांना मोठ्या प्रमाणात गारपीटीचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ज्वारी, हरभरा, फळपीके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. याचबरोबर केंद्र सरकारकडेही 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी (जाधव) येथे गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार आर. यू. सुरडकर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री. रावते यांनी कोयाळी येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या हरभरा पिकाचे गारपिटीने झालेल्या नुकसानाची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना श्री. रावते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदलांमुळे अवेळी पाऊस, गारपिटीचे संकट वारंवार येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आताही गेल्या दोन-तीन दिवसात विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरभरा पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची शासनाला जाणीव असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.

शासनाने एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली असून ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही २०० कोटी रुपयांची मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर येणाऱ्या प्रत्येक संकटात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन नेहमीच कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटामुळे हतबल होऊ नये, असे आवाहनही श्री. रावते यांनी यावेळी केले.

Advertisement
Advertisement