‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. पंकज हरकूट आणि डॉ. सोहल पराते यांचे आवाहन
नागपूर : कोरोनाचे संकट जसजसे वाढत आहे. तसे यासंबंधीची भीती, अफवा आणि संभ्रमही वाढत आहे. त्यात भर सोशल मीडियाने घातली आहे. सोशल मीडियावर कोव्हिडसंबंधी अनेक संदेश फिरतात. काही संदेशांमध्ये थेट कोव्हिडची औषधेच सांगण्यात आली आहेत. अशाप्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणतिही औषधे घेतल्यास जीवाला धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे कोणतिही लक्षणे आढळल्यास किंवा काहीही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकूट आणि कन्सल्टन्ट इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. सोहल पराते यांनी केले.
महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात शनिवारी (ता.२६) डॉ.पंकज हरकूट आणि डॉ.सोहल पराते यांनी ‘कोव्हिड आणि हृदय’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांच्या शंकांचे निरसरण केले.
यावेळी डॉ. पंकज हरकूट म्हणाले, आजच्या काळातील सर्वात धोकादायक आजार कोरोना आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो झपाट्याने पसरत आहे. सुरक्षा घेणे, नियमांचे पालन करणे हाच यापासून बचावाचा उपाय आहे. आधीच काही आजार असलेल्यांना या आजाराचा जास्त धोका आहे. यामध्ये मोठी संख्या हृदयरोगींची आहे. हृदयरोग असलेल्यांना सामान्यांप्रमाणेच कोव्हिडच्या संसर्गाचा धोका आहे. मात्र तो होउ नये म्हणून सर्वसामान्यांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हिड प्रत्येक अवयवावर परिणाम करतो त्याची जास्त बाधा फुफ्फुसाला तर त्या खालोखाल हृदयाला धोका असतो.
त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. आपली नियमीत औषधे बंद करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेउनच कोणतिही औषधे बदलावित किंवा घ्यावीत. सोशल मीडियावर संदेशांनुसार कृपया उपचार करू नये किंवा औषधे घेउ नये. हृदयरोगींना कोरोना झाला असल्यास त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. रुग्णालयात भरती होउनच उपचार करावे. याशिवाय कुणाही व्यक्तीला हृदयासंबंधी जराही सूक्ष्म लक्षणे आढळत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा काळ धोक्याचा आहे. त्यामुळे लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. पंकज हरकूट यांनी केले.
डॉ. सोहल पराते म्हणाले, सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा ‘जागतिक हृदय दिन’ आहे. यावर्षी ‘हृदयरोग स्वत: समजून घ्या, इतरांनाही समजवून सांगा’ अशी थिम आहे. हृदय आणि त्याविषयीच्या आजाराविषयी आपण सर्वांनी जागरूक होणे आवश्यक आहे. याशिवाय ‘हॅपी हायपोक्सिया’ याविषयीही अधिक सजग राहावे. शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी होणे म्हणजे ‘हॅपी हायपोक्सिया’. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यानंतरही रुग्णाला काहीही जाणवत नाही, त्याला आपण स्वस्थ आहोत असे वाटते, परंतू ऑक्सिजनची मात्रा कमी झालेली असते. हे अत्यंत धोकादायक आहे.
शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनची गरज असते. ‘हॅपी हायपोक्सिया’मुळे हृदयविकाराचा जास्त धोका असतो. अचानक खोकला वाढणे, अचानक घाम येणे, जोरजोरात श्वास ही ‘हॅपी हायपोक्सिया’ची लक्षणे आहेत. त्यामुळे कुठल्याही लक्षणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे ते म्हणाले. हृदयविकारासाठी हृदयरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी गेले असता रुग्णाला आधी कोरोना चाचणी का करावी लागते, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आजघडीला सुमारे ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांना कुठलीही लक्षणे नाहीत. या रुग्णांना काहीही त्रास नसला तरी त्यांच्यामुळे इतर रुग्णांना धोका आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी असे व्यक्ती अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दवाखान्यात येणा-या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करणे अत्यावश्यक आहे.
करोनाचे विषाणू फुफ्फुसाहर शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करते. त्यामुळे धोक्याच्या पातळीत येणा-या सर्व रुग्णांनी त्वरीत निदानासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करावी. हृदयविकाराच्या रुग्णांप्रमाणेच धोका सर्वांनाच आहे. त्यामुळे सर्वांनीच विनाकारण घरून निघणे टाळावे, मास्कचा वापर अवश्य करावा, सॅनिटायजरचा सुद्धा उपयोग नियमीत करावा, असेही आवाही डॉ. सोहल पराते यांनी केले.