वृक्ष लागवड अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहराचा सहभाग ८२ हजार ५०० वृक्षांचा राहणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि लोकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर शहरातील अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला आयुक्त अभिजीत बांगर, प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कडू, आशा उईके, नगरसेवक निशांत गांधी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, हरिश राऊत, प्रकाश वराडे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, स्मिता काळे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नगरसेविका संगीता गिऱ्हे, नगरसेवक मुन्ना पोकुलवार, किशोर वानखेडे, प्रवीण भिसीकर, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीनिवास, निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, श्री. वनस्पती शास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे, एसबीएम महाविद्यालयाचे अजिंक्य धोटे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आज प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे. विकास होत असताना वृक्षांची कत्तल होऊ नये, याची काळजीही घेतली पाहिजे. ‘ग्रीन सिटी’ म्हणून नागपूरला देशात क्रमांक एक करण्यासाठी १ जुलैच्या वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, वृक्ष लागवडीसोबतच असलेल्या वृक्षांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी मनपाने धोरण तयार केले आहे. पण यापेक्षाही नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. झाड वाचविण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, यात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पर्यावरणप्रेमींनीही सूचना मांडल्या. यावेळी बोलताना वनस्पतीशास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे यांनी सध्या सुकलेल्या तलावातील माती काढून ती रस्ता दुभाजकांमध्ये टाकण्याची सूचना केली. शिवाय स्थानिक वृक्षांची लागवड करण्याची सूचना केली. ग्रीन फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटजी यांनी झाड लावण्यासोबतच झाड वाचविण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. जी झाडे लावलीत तिला जगविणे आणि जी आहेत त्याचेही जतन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक रोपटे भेट म्हणून देण्यात येईल आणि तीन वर्ष त्याचे संगोपन त्याने करावे. त्यावर गुण देण्यात येईल, ही अभिनव संकल्पना विद्यापीठ अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, एसबीएमचे अजिंक्य धोटे व अन्य प्रतिनिधींनीही यावेळी आपले विचार मांडले आणि वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
तत्पूर्वी ‘वृक्ष लागवड मोहिमेची गरज’ यावर सादरीकरण करण्यात आले. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी वृक्ष लागवड तयारीसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. ८२ हजार ५०० झाडांव्यतिरिक्त नागपूर शहरातील सिमेंट आणि डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा आणि रस्ता दुभाजकांवर ५० हजार झाडे लावण्याचेही प्रस्तावित असून त्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही उद्यान अधीक्षक चोरपगार यांनी यावेळी दिली. बैठकीला संबंधित मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.