Published On : Mon, Sep 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

फुटाळा फाउंटनचे 16 ते 21 सप्‍टेंबर दरम्‍यान ‘ट्रायल शो’

नागपूर: फुटाळा तलावातील पाण्यात सुमधूर गीतांच्‍या तालावर थुईथुई नाचणारा, उचंच उच फवारे उडवणारा, इंद्रधनुषी रंगाची उधळण करणारा, पाण्याच्‍या अप्रतिम ‘स्क्रीन’वर नागपूरच्‍या इतिहास झलक दाखवणारा, अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्‍येकाला बघायला मिळणार आहे.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने येत्‍या, 16 ते 21 सप्‍टेंबर दरम्‍यान शहराच्‍या सौंदर्यात भर घालणा-या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा, अप्रतिम, अवर्णनीय असा म्‍युझिकल फाउंटन आणि लाईट शोचे दरदिवशी रात्री 7 व 9 वाजता असे दोन ‘ट्रायल शो’ आयोजित करण्‍यात आला आहे. या ऐतिहासिक शोचे नागपूरकरांना परत एकदा साक्षीदार होता येणार आहे.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्वपूर्ण तसेच महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारा हा म्‍युझिकल फाउंटन आणि लाईट शो आहे. त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा तयार करण्‍यात आला असून त्‍याला अप्रतिम लाईट व म्‍युझिक शोची जोड देण्‍यात आलेली आहे.

संगीताच्‍या तलावर नाचणा-या या फाउंटनमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान वापरण्‍यात आले असून ते पाहिल्‍यावर डोळे दिपून जातात. मुझिकल फाउंटनबरोबर वाजणा-या संगीताला दिग्गज संगीतकार ए. आर. रेहमान यांनी संगीत दिले असून ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाइन केले आहे. नागपूरच्‍या इतिहासाच्‍या इंग्रजी कॉमेंट्रीला बीग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला असून हिंदी भाषेतील कॉमेंट्री प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी तर मराठीतील कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्‍या भारदस्‍त आवाजात ऐकायला मिळते.

15 ऑगस्‍ट दरम्‍यान या शोचे काही ठराविक लोकांसाठी ट्रायल शो आयोजित करण्‍यात आले होते. पण आता नागपुरातील प्रत्‍येक नागरिकाला या अवर्णनीय शोचा मनसोक्‍त आनंद घेता येणार आहे. गर्दी, गोंधळ, गैरसोय टाळण्‍यासाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीने पासेसची व्‍यवस्‍था केली असून या पासेस नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ, खामला, नागपूर येथून शो च्या दिवशी सकाळी 11 वाजता प्राप्‍त करता येतील. तेव्‍हा प्रत्‍येकाने या नेत्रदीपक फाउंटन आणि म्‍यु‍झिकल शोचा अनुभव घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.

Advertisement