काही साधी भोळी, परोपकारी आणि असामान्य “अजातशत्रू” (ज्याला कोणीच शत्रूच नाही असा) आणि “परम गुरु” (ज्याला सर्वच गुरु -मार्गदर्शक मानतात असा ) देव माणसे क्वचितच जन्माला येतात … त्यांचे आयुष्य खडतर असत …सतत संघर्षपूर्ण…पण हरायचं नाही आणि घाबरायचे नाही..लढत राहायचं …आणि जिंकायचं …. त्यापेकी एक दैवी व्यक्तिव म्हणजे माझे वडील ….कै. शंकरराव लक्ष्मण द्रवेकर. …संपूर्ण इतिहास पुस्तक स्वरूपात लवकरच लिहणार आहे …त्यात विस्तृत माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार….सध्या सारांश स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला…..नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या…
प्रसंग १: “येंडे सावंगी”, यवतमाळ जिल्हातील , कळंब-बाभुळगाव रोड वरील , वेणी कोठा गावाजवळ असलेले , वर्धा आणि बेंबळा नदी च्या संगमावर वसलेले एक टुमदार पण छोटेसे खेडेगावांमध्ये …गावातील पाटलाच्या शेतात साधारण १५/१६ वर्षाचा ” बाबा” (आमचे वडील शंकरराव द्रवेकर ) तुराट्या वेचण्याचे कामात (शेत मजुरी) व्यस्त ……त्यावेळी यवतमाळ पासून साधारण ३० ते ३५ कि मी दूर असलेल्या गावात … यवतमाळच्या म्युनिसिपल हायस्कूल चे हेड मास्तर शाळेत येरझाऱ्या मारत होते ……७ दिवस झाले … १० वि चा निकाल लागलेला (त्याकाळी पूर्व-मॅट्रिक) ……आणि जिल्ह्यातून नव्हे तर पंचक्रोशी तुन पहिला आलेला शंकर द्रवेकर आहे कुठे ….हेड मास्तर सरानी मग चपराशी गावात निरोप घेऊन पाठविला ….चपराशी गाव शोधत शोधत….शेत पालथे घालत घालत आला …… .अरे शंकर यवतमाळ ला चाल हेड मास्तरांनी बोलाविलाय….तू जिल्हयात नाही तर विदर्भ मधून पहिला मेरिट आला आहे…तुला सर्व शोधत आहे …. बघा त्याकाळची परिस्थिती… शंकर मेरिट आलेला …पण ७ दिवस उलटले त्याला काहीच माहित नाही आणि वर शेतमजुरी आणि काबाड कष्ट …कुठल्याही वर्तमान पत्रात बातमी नाही …गावातील पाटील (स्व. येंडे पाटील) जेव्हा कळले …गावातील पोरगा …पंचक्रोशी मधून… बाबा उर्फ शंकर मेरिट आला, त्यांनी गावभर पेढे वाटले ….सर्व गावकर्यांना गोडाधोडाचे जेवण खाऊ घातले (असे बाबाचे मित्र मदनकर दादा सांगतात ) ….असे आमचे वडील ” बाबा” ( शंकर ) …. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मध्ये शिकले ….शिक्षणासाठी गावापासून –यवतमाळ …..कधी पायी तर कधी गावातील बैलबंडी , रात्री- बे -रात्री, उन्हाळा पावसाला, हिवाळा .. नदी पार करावी लागत असे …पण …पण जिद्द शाळेत जायचे …शाळा बुडवायची नाहीच…. खूप अभ्यास करायचा …..आणि नेहमीच प्राविण्य च मिळवायचे .
प्रसंग २: घरची अत्यंत गरीब परिस्थिती, त्यावेळी अभियांत्रिकी ला मेरीट वर प्रवेश मिळत असताना फ़क़्त घरची…. परिस्थिती गरीब असल्यामुळे पण उच्च शिकण्याची जिद्द असलेल्या बाबा ना नंतर नागपूरला शासकीय महाविद्यालय (Institute of Science) मध्ये BSc ला प्रवेश घ्यावा लागला. धंतोली येथील रामकृष्ण आश्रम मध्ये गरीब विध्यार्थ्यांना राहायला वसतिगृह होते तेथे राहायचे आणि महाराजबाग जवळ कॉलेज ला अनवाणी पायी जायचे … पायाला जखमा झालेल्या…. पण रात्री तेल लावायचे आणि विसरून जायचे …घालायला एक कुर्ता पायजमा …दररोज कॉलेज मधून आल्यावर …धुवायचा …..रात्रभर वाळवायचा…सकाळी पुन्हा तोच घालून कॉलेज मध्ये जायचे … काही महिन्यांनी प्रयोगशाळा चे दिवस सुरु झाले ….बाबा अनवाणी कॉलेज ला जात असत ….प्रयोग शाळा मध्ये खाली acid वगैरे पडले असायचे म्हणून पादत्राणे अनिवार्य होती . रसायन शास्त्राचे प्राध्यापक फार कडक होते…एक दिवस त्यांनी बाबाना प्रयोग शाळेतून बाहेर काढले….का तर पायात चप्पल नव्हती म्हणून. पायात जो पर्यंत चप्पल नाही तो पर्यंत प्रयोग शाळेत प्रवेश करता येणार नाही… अशी तंबी दिली … बाबा हिरमुसले …आता काय करावे … .रामकृष्ण मठ मधील मित्रांना हि बातमी समजली…..सर्व मित्रांनी ” चप्पल फंड” जमा केला …१० पैसे…२० पैसे असे जमविले आणि आमच्या बाबा ना स्लीपर विकत घेऊन दिली …तेव्हा बाबाना प्रयोग शाळेत प्रवेश मिळाला . अश्याही विपरीत परीस्थिती मध्ये कधी अर्धवेळ जेऊन तर कधी “वार” लाऊन जेवण करीत ….कॉलेज जीवन संपूर्ण पायी किंवा मित्रांची सायकल ह्यवान बाबानी शिक्षण पूर्ण केले …आणि गुणवत्ता यादीत स्नातक झाले झाले. पुढे विज्ञान स्नातक झालयावरही त्यांना करमेना ….अभियांत्रिकी करायचीच ह्या उद्देशाने त्यांनी (Indian Institute of Telecommunication Engineers) मधून AMIETE ची अभियांत्रिकी पदवी घेतली आणि ती हि मेरीट मधेच.
प्रसंग ३:मी बाबाना खरा देवमाणूस का म्हणतो ह्याची प्रचिती तुम्हाला आता येईल ….बाबा स्वामी राम कृष्ण परमहंस ह्यांचे परम भक्त, स्वामी विवेका नंद ह्यांचे विचार जपणारे आणि त्यावर चालणारे (बाबांचा चेहरा थोडाफार स्वामी विवेका नंद ह्यांच्या सारखाच) ..धामणगाव येथे शिक्षकी पेशात असताना (सेठ फत्तेचंद लालचंद हायस्कूल )….. धामंनगाव रेल्वे स्थानक जवळ एक दिवस किर्रर्र अंधारात ….रात्री मित्रासमवेत रेल्वे रुळावरून घराकडे येत असताना बाबांचा तोल गेला आणि आमचे बाबा अंधारात ३० फुट खोल नाल्यात पडले . नाल्यात डुकरे होती त्यावर मी पडलो असे ते सांगायचे ….तिकडे मित्राला वाटले ‘बाबा’ पडला आणि ते मदत मागण्यासाठी गावाकडे लोकांना बोलवायला गेला…. त्याक्षणी पांढरे शुभ्र वस्त्र नेसलेला एक साधू आला ….बाबा चे जरी हातपाय हालत नव्हते …मूर्च्छा आलेली होती …पण डोळे पाहत होते ……ततो साधू (स्वामी राम कृष्ण परमहंस किंवा स्वामी विवेकानंद च होते बाबांचा ठाम विश्वास) ) ….किर्र अंधारात नाल्यात उतरला आणि बाबाना खांद्यावर उचलून बाहेर आणले …..मित्र येईपर्यंत नजीकच्या दवाखान्यात नेऊन भरती केले आणि तोच साधू गायब झाला….बाबानी त्याचे पुटपुटणे ऐकले …ते नेहमी सांगायचे साधू म्हणत होता ” अभि वक्त हैं…’तेरी बारी नाही आई …आई….सबका भला करणं हैं” ….धामणगाव मध्य त्या साधू ला कधी कोणीच बघितले नव्हते आणि ह्या प्रसंगानंतर आजपर्यंत तो साधू कोणालाच दिसला नाही. आपल्या भक्ताला वाचविण्यासाठी देव स्वत: येतात त्याचेच हे सापेक्ष उदाहरण आहे ….
त्यांच्या आयुष्यातील या काही निवडक प्रसंग वरून हे नक्की लक्षात येते कि संघर्ष नक्की काय असतो …आणि जीवन काय असत….. माझे आजी -आजोबा.. लक्ष्मण -सरस्वती च्या पोटी जन्म घेणारे बाबा घरात सर्वात मोठे– त्यानंतर २ आत्या (सुशिला -करंजगाव आणि बेबी-खापरखेडा ), २ भाऊ (वसंतराव-धामणगाव आणि बबनराव- कोराडी )…आजी आजोबा जरी निरक्षर असले तरीही त्यांनी फार काबाड कष्ट करून ….हाडाची कडे करून म्हणतात ना तसे …बाबाच्या शिक्षणात हातभार लावला ….
निश्वार्थ सेवानिष्ठा, करडी शिस्त आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणारे , जनसामाण्याच्याही मनात च नव्हे तर समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या घरा घरात, नातेवाईकांमध्ये आपल्या मन मोकळ्या आणि सतत हसतमुख स्वभावामुळे स्थान मिळविनारे …..माझे वडील शंकरराव ल. द्रवेकर ह्यांचा येंडे सावंगी च्या लहानश्या गावातून गावातील पाटलाच्या शेतात तुराट्या वेचणाऱ्या शेतमजूर “बाबा” पासून ……. अत्यंत अनुभवी निष्णात दूरसंचार अभियंता “द्रवेकर सर” पर्यंत चा संघर्षमय प्रवास…. हजारो विद्यार्थी घडविणारा आदर्श शिक्षक, अभियंते घडविणारा आणि दूरसंचार विभाग (नागपूर, अकोला, नांदेड, नागपूर) शिखरावर नेणारा अभियंता, ज्या समाजात समाजासाठी “समाज भूषण’, व्यक्तिगत आयुष्यामध्ये “भाऊसाहेब” किवा “दादा” असे अष्टपैलु व्यक्तित्व म्हणजे आमचे बाबा . (या बाबतीत सविस्तर पुस्तक लिहिणे सुरु केले आहे …लवकरच त्याचे प्रकाशन करणार) बाबांचा जन्म झाला “येंडे सावंगी”, यवतमाळ जिल्ह्यातील , कळंब-बाभुळगाव रोड वरील , वेणी कोठा गावाजवळ असलेले , वर्धा आणि बेंबळा नदी च्या संगमावर वसलेले एक टुमदार पण छोटेसे खेडेगावांमध्ये …संगमावर महादेवाचे फार प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे…दर महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरते …कदाचित म्हणून बाबांचे नाव शंकर ठेवल्या गेले .
येंडे सावंगी गावातील सर्वांचा लाडका (विशेष करून गावचे पाटील-येंडे पाटील -स्व. श्रीकांत जिचकार यांचे मामा) हा “बाबा” शिकला….स्वत: समोर आला आणि सोबत सर्वाना मोठा करीत गेला…..फक्त शिक्षणानं च प्रगती होते ह्याचे सापेक्ष उदाहरण …. .
त्याकाळी विज्ञान स्नातक मेरिट च्या आधारावर नोकरी मिळाली आणि बाबा ‘शिक्षक’ झाले…धामणगाव येथे सेठ फत्तेचंद लालचंद हायस्कूल ….विद्यार्थी वर्गात सर्वात आवडते शिक्षक ….आज हि त्यांचे विद्यार्थी घरी येतात …आणि वेगवेगळे किस्से सांगत असतात …… यवतमाळ येथील त्याकाळचे कम्युनिस्ट नेते केशवराव चौधरी (सुदाम काका देशमुख ह्यांचे परम प्रिय मित्र) ह्यांची कन्या संजीवनी ह्यांच्याशी बाबांचे लग्न झाले. (बाबा यवतमाळ च्या त्यांच्या महाविद्यालयीन काळात माझ्या आजोबांकडेच एक खोलीमध्ये राहत होते…(संपूर्ण इतिहास पुस्तक स्वरूपात लवकरच लिहणार आहे …त्यात विस्तृत माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार) ) ..
गावातील संपूर्ण कुटुंब २ भाऊ, २ बहिणी, आई वडील ह्या सर्वाना घेऊन बाबा गावातून शहराकडे आले. शिक्षक असताना बाबासाहेब घारपलकर (शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे त्याकाळचे अध्यक्ष) ह्यांच्या प्रेरणेने बाबांनी दूरसंचार विभागाची परीक्षा दिली आणि मेरीट मध्ये उत्तीर्ण करून दूरसंचार विभागात अभियंता म्हणून रुजू झाले……दरम्यान फक्त एकट्या माणसाच्या योगदानावर सर्व लहान भावांचे शिक्षण …त्यांना नोकऱ्या लावून देणे (शिवाजी शिक्षण संस्था) त्यांचे लग्न संसार थाटून देणे ….बहिणीचे शिक्षण, लग्न आणि त्यानंतरचे सर्व सोपस्कार ते हि मृत्यू होईपर्यंत , आई-वडिलांचा सांभाळ ह्या सर्व कौटुंबिक जबाबदारी सुद्धा त्यावेळेस त्यांनी मोठा भाऊ म्हणून कसलीही अपेक्षा ना ठेवता … पाडल्या ….. इतकेच नव्हे तर आमच्या नवीन पिढीतील लोकांचे लग्न आणि इतर कार्य देखील त्यांनी स्वखुशीने केलेत…..आमचे नातेवाईक, बाबाची मित्र मंडळी …बाबांचे विद्यार्थी आज हि म्हणतात आम्हाला आमच्या मुलं-मुलींची कधीच काळजी नव्हती….त्यांचे लग्न, आजारपण ह्याकरिता आमचे बाबा सर्वांचे मार्गदर्शक होते…आधारस्तंभ होते ….त्यांचा जनसंपर्क फारच दांडगा होता …..आठवड्या-१५ दिवसातून प्रत्यक्ष ला फोन करून ख्याली खुशाली घेत असत ….
त्यात आणखी भर पडली आम्हा तिघांची सुशील दादा, शुभा ताई आणि सर्वात धाकटा मी. जवळपास त्या वेळी आमच्या ३ खोलीच्या किराया च्या घरात त्या वेळेस १२/१५ माणसे असायचीच आणि पाहुणे दररोजच. बाबा सर्वासाठीच एक आधारवड होते…. सर्वांचे (नातेवाईक, मित्र, शेजारी, कर्मचारी) दुख: वेदना आपल्या अंगावर घेणारा, मदत करणारे आणि सुखामध्ये मदत करणारे असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबा.
आज द्रवेकर परिवार आणि नातेवाईक परिवार खूप विस्तारला आहे… .धामणगाव, कोराडी, अमरावती , करंजगाव, मोर्शी चंद्रपूर , यवतमाळ , वडोदरा, खापरखेडा , आणि अमेरिका येथे देखील ..जो फक्त आणि फक्त बाबा च्या ..समोर येण्यामुळे प्रगती करू शकला …..आजही गावातील लोक, बाबांचे जुने मित्र म्हणतात…..सर्व नातेवाईक सर्व समाज म्हणतो …तो खरा ‘देव माणूस’ होता. तो प्रत्येक व्यक्ती जो बाबाच्या संपर्कात आला …तो धान्य झाला
बाबा नसते तर तुम्ही कुठे असता ….येंडे सावंगी च्या शेतावर शेत मजुरी करीत असता …. विचार केला तर कधी कधी खरेच असे वाटते…जर बाबा शिकले नसते…पुढे आले नसते…..सर्वाना पुढे आणले नसते …तर आज आम्ही कुठे असतो. ??? …
ह्या सर्व कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना बाबा साठी दूरसंचार विभाग देखील त्यांचे घरच होते किवा म्हणायचे झाले तर मुख्य घर हे दूरसंचार विभाग च होते. त्यांनी ह्या विभागासाठी अभियंता म्हणून अहोरात्र मेहनत , दिवस नाही, रात्र नाही 24×7 कधीहि काम करण्याची तयारी …अभियंत्यापासून ते ….विभागीय अभियंता पर्यंतचा प्रवास अमरावती –नागपूर-मुंबई-अकोला-नांदेड-नागपूर ..त्यांच्या नैतृत्वात निर्माण झालेले अनेक अभियंते त्यांनी नागपूर विभागाला मिळवून दिलेला प्रथम ISO-Certification. आजही दूरसंचार विभागात बाबांचे नाव अत्यंत आदराने एक प्रामाणिक, अहोरात्र झटणारा अभियंता म्हणून सर्वत्र घेतल्या जाते. Co-axial, Microwave, Optical Fiber Technology, Wireless Technology जस जसा दूरसंचार विभाग आधुनिक होत बाबा ह्या तांत्रिक प्रणाली शिकत गेलेच पण त्यावर त्यांची काम करण्याची पद्धत पाहून सर्वच अचंबित होत. दूरसंचार प्रणालीचा Landline ते आताच्या Mobile प्रणाली पर्यंत बाबांनी सर्व प्रणालीवर निष्णात काम केले आणि दूरसंचार विभागाला एका उंच शिखरावर नेले…. इतकेच नव्हे त्यांचा बराचसा वेळ त्यांच्या वरिष्ठांना उपरोक्त प्रणाली कशी काम करते हे शिकविण्यात जायचा .
राष्ट्रीय दूरसंचार विभागातील अभियंता युनियन त्याचे देखील ते सेक्रेटरी होते …आणि निवृतां झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्त दूरसंचार अभियंता असोसिएशन चे देखील सेक्रेटरी …..त्यांचा सर्व वेळ ..दूरसंचार विभाग चे कार्य …त्यांचे असोसिएशन चे कार्य, समाजाचे कार्य आणि नातेवाईक ह्यांचे कार्य… ह्यात जायचा …दिवसात ४८ तास असायला हवे हे त्यांचे नेहमीचे वाक्य …. . आमचे बाबा … भरभरून लोकोपयोगी कार्य करणारे आणि निश्चल…. प्रचंड असं व्हिजन या माणसाच्या ठायी होतं… जगभरातले मैनेजमेंट गुरु वाकून प्रणाम करतील, प्रामाणिक आणि पारदर्शकतेच्या गप्पा करणारे सगळे समोर देखील उभे राहणार नाही असा भक्कम आदर्श द्रवेकर सर ह्यांनी आपल्या आचरणातुन आयुष्यभर प्रस्थापित केला…दूरसंचार विभागाच्या अभियंत्यांना दिला, विद्यार्थ्यांना दिला तसेच नातेवाईक आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांना दिला…
संघर्षाचे आयुष्य राम कृष्ण मठ, धंतोली येथे गेल्यामुळे बाबा स्वामी राम कृष्ण परमहंस ह्यांचे निस्सीम भक्त, दररोज सकाळ संध्याकाळ स्वामी रामकृष्ण परमहंस ह्यांना नमस्कार केल्याशिवाय आणि मंत्र पठण केल्याशिवाय ते दिवसाची सुरवात करीत नसत. बेलूर मठ येथे त्यांनी दीक्षा घेतली होती. दुरसंचार विभागतून निवृत्त झाल्यावरही बाबांनी स्वतःला संपूर्णपणे सामाजिक तसेच (Indian Institute of Telecommunication Engineers) IETE, Nagpur ह्या संस्थेच्या कार्यासाठी झोकून दिले. IETE चे ते सचिव होते, तसेच संस्थेने त्यांना मानाची Fellowship बहाल केलेली होती. राष्ट्रीय निवृत्त दूरसंचार अभियंता असोसिएशन चे देखील सेक्रेटरी …निवृत्ती नंतरची दुसरी इंनिंग कदाचित जास्त महत्वाची आणि प्रभावी कशी करता येते त्यांनी सर्वाना दाखवून दिले होते ….
समाजासाठी फार मोलाचे योगदान दिले. समाजाची संघटना सुरु करण्यापासून ते बांधण्यापासून ..अर्थात सतरंजी टाकण्यापासून त्या संघटने द्वारे समाजाचे …समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे काही भले झाले पाहिजे ह्या करिता देखील त्यांनी आपले योगदान दिले. त्याकरिता त्यांना “समाजभूषण’ सन्मान देण्यात आला होता.. येत्या १५ ऑगस्ट पासून आम्ही सर्वानी आता हा निर्णय घेतला आहे कि त्यांचे हे कार्य तिथे थांबु नये ….त्याची प्रगती व्हावी ह्याकरिता आम्ही शंकरराव द्रवेकर फौंडेशन ची स्थापना करीत आहोत . ( येंडे सावंगी च्या लहानश्या गावातून गावातील पाटलाच्या शेतात तुराट्या वेचणाऱ्या शेतमजूर “बाबा” पासून ……. अत्यंत अनुभवी निष्णात दूरसंचार अभियंता “द्रवेकर सर” ते IETE चे ते मानाची Fellowship मिळविणाऱ्या बाबाकरिता )
असे अष्टपैलु , जिंदादिल आणि दैवी व्यक्तित्व म्हणजे आमचे बाबा : शंकरराव द्रवेकर.. मला आठवतंय ११ वर्षाआधी (१६ मार्च २०११ ला आम्हाला सोडून गेले.)., त्याआधी २ मार्च ला आम्ही सर्व त्यांच्या मूळ गावी अर्थात येंडे सावंगी ला महा शिवरात्री ची यात्रा साजरी करायला गेलो होतो . उद्देश्य हाच होता कि आम्हाला गावाला प्रथमच भेट देत होतो आणि कदाचित बाबाना त्यांच्या गावातील मातीची आठवण होत होती … बाबानी पुरात वाहून गेलेल्या त्या घराची माती कपाळावर लावली , महादेव मंदिर ला २१००० देणगी दिली आणि दरवर्षी देण्याचा मानस केला. हा निव्वळ योगायोग होता कि काय माहित नाही ……
असो …..पण म्हणतात ना माणूस गेला कि त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक येतात त्यावरून माणसाची किंमत कळते ….बाबाच्या अंत्ययात्रेला तर महासागर आला होता …. घरी पण आणि घाटावर पण …मला नंतर कळले ….पोलिसांनी स्वत: येऊन रास्ता ब्लॉक केला होता …..जो हजर होता तो बाबाकरिता होता …फक्त बाबाकरिता ….सर्व हेच म्हणत होते …आज देवाने आपला खरा देवमाणूस नेल
.
…Sachin Dravekar