पाचपावली सुतिकागहाची आरोग्य समिती सभापतीद्वारे पाहणी
नागपूर: पाचपावली सुतिकागृहातून स्त्रियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते अत्याधुनिक करावे. सुतिकागृहातील पायाभूत सुविधा सुरळीत करून सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव २० दिवसात सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
मंगळवारी (ता.१६) सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पाचपावली येथील सुतिकागृहाला भेट दिली व पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रूघवाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता खंडाईत, मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी तथा समता जेसीसचे सचिव अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सुतिकागृहातील कामकाजाचा आढावा घेतला. सुतिकागृहातील शस्त्रक्रीया विभाग, प्रसुती कक्ष, बाह्यरूग्ण विभाग, पॅथोलॉजी विभाग, नोंदणी कक्षाला भेट देऊन कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. सुतिकागृहाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. पंतप्रधान जननी सुरक्षा योजना याठिकाणी यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सरिता कामदार यांनी दिली. दवाखान्यात पायाभूत सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात, असेही सभापती कुकरेजा यांनी सांगितले. सुतिकागृहातील खाटा जुन्या झालेल्या आहेत. त्याचे नूतनीकरण किंवा त्या नव्याने खरेदी संदर्भातील प्रस्ताव देण्याचे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. सुतिकागृहात सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याबाबत विचार करण्यात यावा, असेही कुकरेजा यांनी सांगितले.
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. दिवसातून एक दिवस सुतिकागृहाच्या बाहेरील परिसर स्वच्छ करण्यात यावा, असेही निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. यावेळी पाहणी दौऱ्यात स्वास्थ निरिक्षक रोशन जांभुळकर, विद्युत अभियंता प्रदीप खोब्रागडे, बांधकाम अभियंता प्रवीण कोटांगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
बेझनबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
सुतिकागृहातील पाहणी केल्यानंतर वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी बेझनबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस केली.