कामठी -स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एस के पोरवाल महाविद्यालय जवळील समता नगर परिसरात 20 ऑगस्ट 2019 ला दिवसाढवळ्या दुपारी 2 च्या सुमारास लुम्बीनी नगर कामठी रहिवासी 19 वर्षीय तरुण सौरभ सिद्धार्थ सोमकुवर चा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोन आरोपीना नागपूर सेशन कोर्ट डी जे 4 नागपूर न्यालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच 20 हजार रुपये दंड ठोठावला.दंड न भरल्यास आरोपींना आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
शिक्षा सुनावल्या आरोपीमध्ये रोशन रमेश सकतेल (वय 38 वर्षे )व राजू छोटेलाल सकतेल ( वय 49 वर्षे) दोन्ही राहणार सैलाब नगर कामठी, यांचा समावेश आहे तसेच तिसऱ्या आरोपीला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक नामे सौरभ सोमकुवर हा गोयल टॉकीज चौक स्थित गणेश फोटो स्टुडिओमध्ये खाजगी पद्धतीने कामे करायचा मात्र काही दिवसांपासून मृतक तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याने कामावर जाणे बंद करीत घरीच विश्रांती घेत होता. दरम्यान घटनेच्या दिवशी 20 ऑगस्ट 2019 ला दुपारी 2 दरम्यान त्याचे वडील सिद्धार्थ सोमकुवरला कामठी बस स्टँड वर सोडून एक्टीवा दुचाकी क्र एम एच 40 ए वाय 5993 ने कुंभारे कॉलोनीत राहत्या घरी परत जात असता यातील नमूद आरोपीनी त्यास सदर घटनास्थळी धारदार शस्त्राने गळ्यावर, छातीवर, पोटावर असे 16 च्या वर वार करून रक्ताच्या थारोळ्यात निर्घृण खून केला होता.
या खुन प्रकरणातील शिक्षा झालेल्या दोन आरोपींना तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बाकल व सह पोलिसांनी घटनेच्या दिवशीच भादवी कलम 302,34 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केली .याप्रकरणाची काल नागपूर सेशन कोर्टात झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सदर नमूद दोन्ही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास नवीन कामठी पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी केले होते. या न्यायालयीन सुनावणीत सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता गनगने मॅडम यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई सुरेश बारसागडे,पोलीस हवालदार काळे,हेड कॉन्स्टेबल पोटभरे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्राम यांनी काम पाहिले.
_ संदीप कांबळे , कन्हान न्यूज