नवी दिल्ली : चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार-2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारीका, परिचारीका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहाय्यकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. केरळमधील कोझीकोड येथील परिचारीका लिनी साजीश यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्या पतीने हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारीका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्षे सेवा दिली तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्यसेवेत कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. श्रीमती पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे आदि केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रीय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात श्रीमती पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका वठवली आहे. तसेच, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य साहाय्यक आशा गजरे या गेल्या 33 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सर्वाधिक 28 वर्षे शहरी भागात तर 5 वर्षे आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान केली. श्रीमती गजरे यांनी कुष्ठरोग नियत्रंण कार्यक्रम, क्षयरोग, मनोविकार, संसंर्गजन्य रोग, लसीकरण आदी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांनी कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी एमएमआर (गालगुंड, गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमाद्वारे) शून्य टक्क्यांवर आणला तर नवजात बालकांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणले. श्रीमती गजरे यांचे आरोग्य सेवेप्रती समर्पण व उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.