नागपूर: सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झाशी राणी मेट्रो स्टेशनसमोरील एका खांबाला दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.
ओम संजय बहाडे (२०) आणि कार्तिक सुनील मांडवकर (२०) अशी मृतांची नावे आहेत, दोघेही मूळचे , नागपूर आणि यवतमाळचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ओम आणि मार्केटिंगचा अभ्यासक्रम करत असलेले कार्तिक हे दोघे (एमएच-29-बीएक्स-2420) मोटारसायकलवरून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर जाण्यास निघाले.
ओमचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी मेट्रो रेल्वेच्या खांबावर जाऊन आदळली. दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यानंतर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी तरुणांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.