नागपूर : कुरिअरद्वारे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 22 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या जयताळा रोडवरील कुरिअर कंपनीबाहेर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत कारसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गुन्हेगार ओरिसा येथून पार्सलच्या स्वरूपात गांजा मागवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यांतर्गत जयताळा रोडवर असलेल्या एक्स्प्रेस बिझ नावाच्या कुरिअर कंपनीच्या कार्यालयाबाहेर पार्सल घेऊन बसलेल्या दोन आरोपींना अटक केली.
आरोपींमध्ये करण पोथीवाल रा. मानेवाडा आणि शाहरुख करीम खान रा. बडा ताजबाग यांचा समावेश आहे. आरोपींच्या कुरिअरद्वारे गांजाची तस्करी होत असल्याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली होती. आरोपींनी ओरिसा येथून गांजाचे पार्सल मागवले होते.आरोपी हे पार्सल घेऊन कारमधून जात असताना आधीच थांबलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 22 किलो गांजा, तीन मोबाईल फोन आणि एक कार आणि सुमारे 6.5 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना अजिंक्य नावाच्या अन्य एका आरोपीला माल पोहोचवल्याचे सांगितले. यानुसार पोलिसांनी इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.