नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील माती घेऊन गुरुवार (ता.२६) रोजी मनपाचे दोन स्वयंसेवक राज्याची राजधानी मुंबई येथे दखल झाले. “मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाला नागपुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून, नागपूर महानगरपालिकेतील १० लाख १३५१ कुटूंबांनी उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. नागपूर शहराचे अमृत कलश मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
मनपाच्या दहाही झोन अंतर्गत संकलित केलेल्या माती आणि तांदळाच्या अमृत कलशाला घेऊन श्री. प्रतीक तुरुतकाने आणि श्री. शुभम सुपारे हे मनपाचे दोन्ही स्वयंसेवक बुधवार (ता.२५) रोजी दुरांतो एक्सप्रेसने राज्याची राजधानी मुंबई येथे रवाना झाले होते, याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अमृत कलश वहन करून नेणाऱ्या दोन्ही स्वयंसेवकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनपाचे उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, श्री. सुरेश बगळे, क्रीडा अधिकारी श्री. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी रेल्वे स्थानकावर प्रामुख्याने उपस्थित होते. मनपाचे दोन्ही स्वयंसेवक गुरुवारी सकाळी ते मुंबईत दाखल झाले.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरात राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, अमृत कलश यात्रा उपक्रमांना विविध झोनमध्ये स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, गणमान्य व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
मागील आठवड्यात नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून संकलित मातीचे कलश सन्मानपूर्वक रथाद्वारे संविधान चौकातून ढोल ताशा पथक, लेझिम आणि देशभक्तीपर गीतांच्या गजरात नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आणण्यात आले होते. दहाही झोनस्तरावर नागरिकांनी अर्पित केली माती आणि तांदळाचे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर एक अमृत कलश तयार करून, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या हस्ते नागपूर शहराचे हे अमृत कलश मनपाच्या दोन स्वयंसेवकांना सुपूर्द करण्यात आले होते. मुंबई येथून हे कलश देशाची राजधानी दिल्ली येथील कर्तव्य पथवर अमृत वाटिकेसाठी पाठविले जाणार आहेत.
मुंबईच्या आजाद मैदानावर राज्यातील सर्व अमृत कलशांचे २७ ऑक्टोबर रोजी पूजन करण्यात येवून ते दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत. दिल्ली येथे ३१ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये ‘अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या सन्मानार्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाणार आहे.