नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले की मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी यूएईच्या लुलू समूहाशी चर्चा केली आहे. मिहानमध्ये वर्ड-क्लास कन्व्हेन्शन सेंटर बनवण्याची योजना असून यात 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचेही गडकरी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण विकसित झाल्यानंतर एकट्या कन्व्हेन्शन सेंटरमुळे एक लाख नोकऱ्या निर्माण होतील. नागपूरच्या पायाभूत सुविधा आणि विकास या विषयावरील टेडएक्स कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
फुटाळा येथे एक तरंगता प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येणार आहे. तेलंगखेडी आणि अंबाझरी तलावातील प्रकल्पांमध्ये 10,000 रोजगार निर्मितीची क्षमता आहे. फुटाळा फाउंटनबरोबरच एक 11 मजली इमारत तयार होत आहे. यामध्ये रेस्टॉरंट्स, 1,100 कार आणि 800 स्कूटरसाठी पार्किंग देखील असेल. 5,000 स्क्वेअर फूट परिसरात किमान 25 रेस्टॉरंट असतील. त्याच रस्त्यावर स्ट्रीट फूड जॉइंट्स असतील. त्या विक्रेत्यांनाही त्यांच्या आवाक्यात असलेल्या दरात स्लॉट मिळतील, असेही गडकरी म्हणाले. 11 मजली इमारतीचे चार मजले आतापर्यंत बांधण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. फुटाळा येथील फ्लोटिंग प्लॅटफॉर्मची क्षमता 1,000 व्यक्तींसाठीची असेल. याठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.
तेलंगखेडी बाग फुलांच्या 800 प्रजातींसह कमळ बाग म्हणून विकसित करण्याची आपली योजना आहे. ते म्हणाले की या प्रकल्पाबद्दल मला खूप आवड आहे आणि त्यांनी त्यांच्या खासदार निधीतून 50 लाख रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे जवळच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये गुलाबाच्या 5500 प्रजाती असतील.
सध्या मिहानमध्ये 68000 नोकऱ्या आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ते एक लाखापर्यंत नेण्याची मंत्र्यांची योजना आहे. सांडपाण्याच्या पाण्यापासून हायड्रोजन बनवण्याचेही त्यांनी सांगितले.तसेच नागपुरात लवकरच एक मोठी शैक्षणिक संस्था सुरू होत असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नसल्याचेही गडकरी म्हणाले.