• प्रमुख पाहुणे डॉ. आयुश्री देशमुख यांनी विशेष दिव्यांग मुलांना मदत करण्याचे दिले आश्वासन.
• 700 विशेष मुलांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये घेतला भाग.
दरवर्षी रोटरी क्लब, नागपूर विशेष दिव्यांग मुलांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करतो आणि या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. यावर्षी सुद्धा 42 विशेष शाळांतील सुमारे 700 विशेष मुलांनी विविध क्रीडा उपक्रमात भाग घेतला. यामध्ये मूकबधिर, अंध, मानसिकदृष्ट्या अपंग आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गाचा समावेश होता. 14 फेब्रुवारी 2023 रोजी मानकापूर इनडोअर स्टेडियमवर सकाळी 8.00 ते 4:30 या वेळेत ‘उडान: विशेष दिव्यांग मुलांसाठी एक-दिवसीय कार्यक्रम’ रोटरी क्लब आणि समाजकल्याण विभाग- जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. आयुश्री आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे समाजकल्याण अधिकारी श्री. प्रवीण मोंडे होते.
डॉ. आयुश्री देशमुख म्हणाल्या, “विशेष दिव्यांग मुलांना प्रवृत्त करण्याची गरज आहे. ही मुले खेळातही आपले कौशल्य दाखवू शकतात. या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांनी पुढे यावे. या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या शिक्षकांचे मला मनापासून कौतुक करावेसे वाटते. त्यांचे धैर्य, संयम आणि विद्यार्थ्यांना समजून घेण्याची आणि प्रेरित करण्याची वचनबद्धता वाखाणण्याजोगी आहे. गेल्या 13 वर्षांपासून अशा भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी रोटरी क्लब, नागपूरचे अभिनंदन करते.” रोटरी क्लबने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि विशेष मुलांना त्यांच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
‘उडान’ हा रोटरी क्लब, नागपूरच्या प्रमुख प्रकल्पांपैकी एक आहे आणि हा प्रकल्प सुप्रसिध्द लता मंगेशकर रुग्णालय, नागपूरद्वारा प्रायोजित आहे. ‘उडान’ हा सुमारे 1000 लोकांचा सहभाग असलेला एक मोठा प्रकल्प आहे, ज्यामध्ये 700 विशेष दिव्यांग मुले, 150 शिक्षक आणि तांत्रिक सहाय्य कर्मचारी, सुमारे 120 रोटेरियन आणि 100 रोटरॅक्टर्स यांचा समावेश आहे, ज्यांनी या उदात्त उपक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. हे रोटरॅक्टर्स आयजीजीएमसी, सदाबाई रायसोनी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ नागपूरचे होते.
मानकापूर इनडोअर स्टेडियमच्या सुंदर ठिकाणी अनेक सांघिक क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या संघांना मेडल व बक्षिसे प्रदान करण्यात आली. सर्व सहभागींना टी-शर्ट आणि ट्रॅक देखील प्रदान करण्यात आले.