महागायक अभिजीत कोसंबीने रसिकमन जिंकले; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह
नागपूर: ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ या आणि अशा अनेक चेतविणाऱ्या, महापुरुषांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची महती सांगणारी एकाहून एक अशी सरस गीते गाऊन महाराष्ट्राचे महागायक अभिजीत कोसंबी यांनी रसिकांना जिंकले.
निमित्त होते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती समारोहाचे. नागपूर महानगरपालिका आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. २८ मे) सायंकाळी नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन्स मुख्यालयातील हिरवळीवर आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सेव्ह द चिल्ड्रन, इंडियाचे विभागीय समन्वयक अनिरुद्ध पाटील यांचे प्रबोधन आणि महागायक अभिजीत कोसंबी यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, नगरसेवक भगवान मेंढे, राजेंद्र सोनकुसळे, नगरसेविका उज्ज्वला बनकर, वंदना भगत, भंते नागाप्रकाश, सर्वश्री सेवानिवृत्त विभागीय परिवहन अधिकारी शरद जिचकार, मंत्रालयातील महसूल विभागाचे कक्ष अधिकारी शरद ढोके, सहायक आयुक्त महेश मोरोणे, राजू भिवगडे, अशोक पाटील, विजय हुमणे, कार्यकारी अभियंता राजेश राहाटे, अभियंता कल्पना मेश्राम, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, अशोक पानतावणे, अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी चारही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यानंतर महागायक अभिजीत कोसंबी, प्रबोधनकार अनिरुद्ध पाटील, संगीतकार भूपेश सवाई, पल्लवी मडके-नीतनवरे यांचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर महागायक अभिजीत कोसंबी यांनी महापुरुषांच्या गौरवार्थ गीतांजली अर्पण केली. महापुरुषांचे कर्तृत्व सांगणारे एका पेक्षा एक सरस गीते गाऊन रसिक मनाला चेतविले. ‘शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या उदरातूनी अरुणोदय झाला’ ह्या गीतातून शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगितला तर ‘हा फुल्यांचा देश हो, जोतिबांचा देश हो’ ह्या गीतातून सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांची महती गायिली. ‘हिरे माणके, सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षि शाहू राजा तुजला मानाचा मुजरा’ ह्या गौरवगीतातून छत्रपती शाहू महाराजांची थोरवी सांगितली. ‘दलितांचा राजा भीमराव माझा, दीनदुबळ्यांची झाली सावली, त्यानं माणसाला माणुसकी दावली’, ‘साऱ्या जगामध्ये होईल निळी रोषणाई रं, ही माझी भीमशाही रं’ ह्या गीतांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी केली. ‘भीमराज की बेटी मैं, जय भीमवाली हूं’ ह्या आणि अन्य गीतांवर गायिका पल्लवी मडके-नितनवरे यांनी टाळ्या घेतल्या तर मनपातील कर्मचारी जयंत बन्सोड यांनी गायिलेल्या ‘पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा’ ह्या गीताने ‘वन्स मोअर’ मिळविले. यश अशोक कोल्हटकर यांनी ‘छातीठोक सांगू या जगाला, असा विद्वान होणार नाही’ ह्या आणि अन्य गीतांतून रसिकांची वाहवा मिळविली. गायक मोहनकुमार भोयर, गौरव बन्सोड यांनीही भीमगीते गाऊन स्फुरण चढविले. ‘ए मानव तू मुख से बोल, बुद्धं सरणं गच्छामि…’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाला प्रसिद्ध संगीतकार भूपेश सवाई यांनी स्वरसाज चढविला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. तर आभार कर्मचारी नेते राजेश हाथीबेड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनोद धनविजय, गौतम पाटील, डोमाजी भडंग, राजेश वासनिक, विशाल शेवाळे, सुशील यादव, वंदना धनविजय, वंदना नायडू, पुष्पा चंद्रिकापुरे, संजय वागळे, जयंत बन्सोड, डोमाजी भडंग, सुशील यादव यांच्यासह मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मनपातील अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
अनिरुद्ध पाटील यांचे प्रबोधन
संगीत रजनीच्या अगोदर सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे विभागीय समन्वयक अनिरुद्ध पाटील यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचे नियोजन आणि दूरदृष्टी, महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक क्रांतीतून दिलेली दिशा, छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्था झुगारून मांडलेला विचार आणि त्या विचारांच्या साक्षीनेच देशाला दिलेले संविधान आदींची सांगड घालत त्यांच्या पुरोगामी विचारधारेचा उहापोह केला. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. जास्त मिळाले तरी तक्रार करतो आणि कमी मिळाले तरी तक्रार करतो. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा जे मिळते त्याचे संवर्धन करा, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार मांडत दुष्काळी परिस्थिती ओळखणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांवर तेव्हाच अंमल केला असता तर आज दुष्काळी परिस्थिती या देशावर ओढावली नसती, असे सांगितले. या महापुरुषांच्या विचारांवर चला, देश प्रगतीकडे जाईल, असा संदेश त्यांनी आपल्या प्रबोधनातून दिला.