मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये वर्सोव्यातून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ल्यातून संदीप नाईक यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये 90-90-90 असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लवकरत मविआचा जागावाटप स्पष्ट होईल. परंतु, त्याआधीच आता मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करू लागले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने सामना या मुखपत्रातून शनिवारी (ता. 26 ऑक्टोबर) सकाळी 15 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर पुन्हा काही तासांनी ठाकरे गटाने तिसरी यादी जाहीर केली असून यामध्ये मुंबईतील तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
त्यामुळे गेल्या तासांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकूण 18 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता एकूण 83 उमेदवारांची ठाकरे गटाकडून घोषणा करण्यात आली आहे.