नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना एकही विकासाचे काम केले नाही. आता ते शरद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले असून त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. संघाच्या प्रणालीवर चालणारे उद्धव ठाकरे आता स्टॅलिन, शरद पवार, राहुल गांधी यांचे प्रवक्ते झाले आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या विजयादशमनिमित्ताने झालेल्या भाषणावरही त्यांनी ताशेरे ओढले.
उद्धव ठाकरे हे सोन्याचा चमचा घेऊन बदामाचे दूध पिणारे नेते आहे त्यामुळे त्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.ते हिंदू संस्कृतीवर टीका करणाऱ्यासोबत ते राहतात त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाबाबत बोलू नये. महाविकास आघाडीमध्ये बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यांच्या या छळाला कंटाळून एकनाथ शिंदे आणि ४० आमदार त्यांना सोडून गेले. शरद पवार यांनी बहुमत सोबत असताना बेइमानी केली म्हूणन घरातला माणूस त्यांना सोडून गेला, असा घणाघातही बावनकुळे यांनी केला.
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी एकमुखी मागणी केली आहे. भाजपचीही तीच मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.