नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची ती आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकत नाही.आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक प्रकारे आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहील. तसेच उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसेच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता.आपका क्या विचार है? असे मला विचारले होते मी त्यांना हे सांगितले की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आले तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेससोबत गेले. औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांबरोबर सत्तेसाठी जाऊन बसले हे लोकांना मुळीच पटलेले नाही, असेही मोदी म्हणाले.