भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयतही गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे आंदोलन खोटारडे आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, माजी मंत्री आदित्य ठाकरे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या विषयावरून तळेगाव येथे करत असलेले आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आहे. हे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे.
आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवावा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या सरकारच्या काळातील आदेश दाखवावा, असे आव्हान मा. बावनकुळे यांनी दिले.
पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा काहीजणांनी दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून मा. बावनकुळे म्हणाले की, अशा घोषणा देणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करतील याची आपल्याला खात्री आहे.
राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रवास करत असून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. त्याप्रमाणे बारामती मतदारसंघाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आढावा घेतला. बारामती मतदारसंघात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले पाहिजे, असा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री केले नाही अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता मा. बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस असून लवकरच आपल्याला राजकीय स्फोट झालेला दिसेल.
शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला परवानगी मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखे काही नसल्याने ही केवळ टोमणे सभा होईल आणि आपल्यासह अनेक नेत्यांवर वैयक्तिक चिखलफेक होईल. आतापर्यंत फेसबुक लाईव्हमध्ये असेच होत होते. त्यामुळे आता लोक उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत नाहीत.