नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात दाखल झाले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.
ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केलं. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे.