नवी दिल्ली: इंडिया आघाडीच्या दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर इंडिया आघाडीचा चेहरा कोण?असा सवाल यावेळी ठाकरेंना करण्यात आला. यावर ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या डोक्यात नेतृ्त्त्व करण्याची हवा नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे.
इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला नाही तरी एका निमंत्रकाची गरज आहे. उद्या निमंत्रकच पंतप्रधान होईल, असे काही नाही. निवडणुकीचं घोडामैदान आता जवळ आलंय, सैन्यही जमलंय, पण या सैन्याला पुढे घेऊन जाणारा कोणीतरी हवा. एरवी सगळे नेते आपापल्या राज्यात बिझी असतात. या सगळ्यांना एकत्र आणणारी व्यक्ती हवी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी त्यांना, ही जबाबदारी तुमच्याकडे आली तर स्वीकाराल का? असा प्रश्न त्यांना विचारला. यावर बोलताना ठाकरे म्हणाले. आजच्या बैठकीत मीदेखील काही नावं सुचवणार आहे. तसेच मी काही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही. मी मुख्यमंत्रीपद हे जबाबदारी म्हणून स्वीकारले होते.
मला जेव्हा कळाले तेव्हा मी मुख्यमंत्रीपद एका झटक्यात सोडलंही होतं. मी काही वेडीवाकडी स्वप्न पाहणार नाही. मला पंतप्रधान व्हायचे, असे नुसते स्वप्न पाहण्यात काय अर्थ आहे. जनतेलाही तुम्ही पंतप्रधान म्हणून हवे आहात का? याचा विचार केला पाहिजे. इंडिया आघाडीतील मतभेद आता मिटले असून सर्वजण एकत्र आले पाहिजे. आगामी काळात आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र राहायला पाहिजे.
इंडिया आघाडीच्या डोळ्यासमोर पंतप्रधान मोदी नाहीत, तर भारत देश आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना बदललं तसे मोदींनाही बदलले जाऊ शकते. हा भाजपचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.