नागपूर: मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून १८ खासदार विजयी झाले होते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तेवढेच खासदार विजयी करून दाखवावे, असे थेट आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गत लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा तर विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून शिवसेना उमेदवार विजयी झाले होते, ही आठवणही त्यांनी करून दिली.
ते कोराडी (जि. नागपूर) येथे बुथस्तरीय कार्यसमिती बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, काल इंडी आघाडीच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे केली नाही. मताच्या राजकारणाकरिता उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली आहे. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून बसले. हिंदू आणि ओबीसींचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींना ते शरण गेले आहेत.
• राहुल गांधी यांचे कालचे भाषण म्हणजे हास्यजत्रा होती. त्यांच्या भाषणात विकासाबद्दल आणि व्हिजनबद्दल काहीच नव्हते. केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका त्यांनी केली.
• शरद पवार यांची परिस्थिती बारामतीच्या बाहेर जाणार नाही अशी झाली आहे. एक परिवार, एक मतदारसंघात ते अडकले आहेत.
• नवनीत राणा यांनी अमरावती मधून प्रचाराला सुरुवात केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, नवनीत राणा अद्याप भाजपात आल्या नाहीत.
• मोदीजींचा संकल्प घरोघरी पोहचविणार
कोराडी येथील बुथ क्र. २८ येथील बुथस्तरीय कार्यक्रमात सहभागी झालेले श्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील ९७ हजार १२५ बुथवर बुथस्तरीय कार्ययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती श्री बावनकुळे यांनी दिली. भाजपाचे ३३ हजार ३२३ पदाधिकारी पंचायत ते पार्लियामेंट पर्यंत पंतप्रधान मोदींचा विकसित भारताचा संकल्प घरोघरी पोहचविणार आहोत. प्रत्येक सुपर वॉरियर्सला दोन बुथ दिले असून २४ संघटनात्मक कामे पूर्ण करणार आहे.
ते असेही म्हणाले…
• महायुती ४५ प्लस जागा जिंकणार , हा महाराष्ट्राचा मूड
• एक दोन दिवसांत महायुतीच्या सर्व जागा जाहीर होतील
• ५१ टक्के मतांसाठी लढाई, कुणाला संपविण्यासाठी नाही
• रामटेकसाठी शिंदेंनी विनंती मान्य केल्यास भाजपा लढणार
• रामटेकचा खासदार ५१% मते घेऊन महायुतीचाच निवडून येईल