नागपूर :उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून ताशेरे ओढले आहे. लाडकी बहीण योजना सरकारने मतांसाठी निवडणुकी आधी जाहीर केली होती. आचारसंहिता लागल्यानंतर महायुती सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा केले नाही. नवं सरकार ही आलं आहे. त्यामुळे मागिल सर्व महिन्यांच्या बॅकलॉगसह बहिणींच्या खात्यात पैसे तातडीने जमा करावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता या योजनेत आवडती बहीण नावडती बहीण असा भेद करू नये असेही ठाकरे पत्रकार परिषद घेत म्हणाले आहे.
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आधी अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार जनतेने पाहीले. आताचे सरकार हे ईव्हीएम सरकार आहे. अशा या सरकारला आमच्या शुभेच्छा आहे. नाईलाजाने आता या सरकारकडे जनतेच्या आपेक्षा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकी आधी पाच महिन्यांचे पैसे बहीणींच्या खात्यात जमा केले आहेत.
महायुतीने निवडणुकीनंतर 2100 रूपये देणार असे आश्वासन दिले होते. हे पैसे तातडीने बहीणींच्या खात्यात जमा करावेत. त्यांच्या आता कोणतेही निकष लावू नयेत. जसे सरसकट सर्वांना आधी पैसे देण्यात आले तसेच आताही देण्यात यावेत. आवडती आणि नावडती बहीण असा भेदभाव करू नये. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्या पाहायला मिळत आहे.
मंत्रिपद मिळाले त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार मोठ्या आवाजात फुटत होते असं ठाकरे यावेळी म्हणाले.महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पण तरीही सरकार स्थापनेला वेळ लागला. आता खाते वाटपालाही विलंब होत आहे. बिन खात्याचे मंत्री सभागृहात बसत आहेत. हे अधिवेशन म्हणजे गंमत आहे का?असा संतप्त सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.