नागपूर : राज्यात औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे सध्या औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य आहेत.भविष्यात ते या क्लबचे अध्यक्षही होतील, असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडवले-
चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले, तेव्हा त्यांच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडवले. मतांच्या लांगुलचालनासाठी त्यांनी आपल्या वडिलांचे विचार सोडले. त्यामुळे मी ते औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाल्याचा आरोप केला होता. पण आता ते पुढल्या काळात औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील.
काँग्रेससह शरद पवार व उद्धव ठाकरे यांना 2047 पर्यंत कोणताही वाव नाही. त्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीने तोपर्यंत वाट पहावी. त्यांनी विरोधी पक्षात काम करावे. याकरिता माझ्या त्यांना शुभेच्छा, असल्याचे बावनकुळे म्हणाले.