मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्रित येत मोट बांधली.या इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), नॅशनल कॉन्फरन्स, द्रविड मुन्नेत्र कळघमसह देशातले अनेक मोठे पक्ष सहभागी झाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तर इंडिया आघाडी कडून पंतप्रधानपदासाठी कोणता चेहरा समोर येईल, यावर अद्यापही खुलासा झालेला नाही.
दुसरीकडे लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण ४८ जागा असल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरु आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला.
यावर संजय राऊत आधी मोठ्याने हसले आणि म्हणाले, उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे, राष्ट्रवादी चेहरा आहे. इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधानपदाचा चेहरा होईल. याबाबत आघाडीची अद्याप बैठक झालेली नाही. आम्ही चर्चा केल्यानंतरच यावर विधान करणार, असे राऊत म्हणाले.