मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी (३१ ऑक्टोबर) महत्त्वाचा आदेश देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पुन्हा खडेबोल सुनावले. न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे म्हणत शिंदे सरकारवर निशाणा साधला.
आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाचे काय महत्त्व आहे, हे या निकालानंतर समजेल. इतकेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांती घटना व देशातील लोकशाही टीकणार की नाही हे ठरणार आहे. याकडे देशातील नागरिकांचे नाही, तर जगाचे लक्ष लागल्याचे ठाकरे म्हणाले.
आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही आहे आणि तीच लोकशाही धोक्यात आली असेल, तर आपण सर्वजण आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानणार आहे की नाही? ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न जुमानता आपल्या मर्जीने, आपल्या मस्तीने वागायला लागले तर आपल्या देशाचे होणारे हाल कुणालाही सावरता येणार नाही,असेही ठाकरे म्हणाले.