नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या निर्णयावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरे यांच्या गटात पक्षात फूट पडल्यानंतर आमदार, खासदार सोडून गेले तेव्हाच त्यांचे पक्षातील नेतेपद संपले होते. अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य असून उच्च न्यायालयात जाण्यापासून त्यांना कोणीही रोखले नाही, त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल, असे विधान बावनकुळे यांनी नागपुरात केले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारावर नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालाचा पुढील राजकारणाशी काहीही संबंध नाही. तसेच पक्षांतरावरही बावनकुळे यांनी भाष्य केले. विविध पक्षातील नेते यापूर्वीच एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.