नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हे पाहता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपवर सातत्याने टीका करत आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत आहेत. फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेले असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी यातून बाहेर पडावे. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीच मोठे होऊ शकत नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे ते नैराश्यात आहे. ते त्याच मानसिकत बोलत आहेत. फडणवीस यांनी गुरुवारी पौराणिक ग्रंथाचे दाखले दिले.
त्यात सत्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप समन्वयाने केले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. खाते वाटपाआधीही ते कुठल्याही विभागाची बैठक घेऊ शकतात, असे बावनकुळे म्हणाले.