मुंबई : महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे.
हे पाहता नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला त्याच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
त्यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देसाईही आहेत. आज सकाळीच फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंचे विश्वासू नार्वेकर फडणवीसांची भेट घेत असल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत भेटीचे कारण स्पष्ट केले. राज ठाकरेंची भेट कुठलीही राजकीय नव्हती. ही कौटुंबिक भेट होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मला अभिनंदनचा फोन आला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की, मी तुम्हाला भेटायला घरी येईन. त्यानंतर आज दादरमध्ये कार्यक्रम होता. त्याच्या आधी मी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय भेट होती ही चर्चा फक्त माध्यमातून आहे. ही भेट कुठलीही राजकीय नव्हती. केवळ कौटुंबिक भेट होती. तसेच राज ठाकरेंच्या घरी मी ब्रेक फास्ट केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.