नागपूर (उमरेड) – एमआयडीसीमधील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काल सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात 11 कामगार गंभीररित्या भाजले असून त्यापैकी पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आज महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला 60 लाखांची मदत-
या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना 60 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यापैकी 55 लाख रुपये कंपनीकडून तर 5 लाख रुपये सरकारकडून दिले जातील.
काम करण्यास अक्षम झालेल्या जखमींना 30 लाखांची मदत-
या दुर्घटनेत जखमी होऊन काम करण्यास असमर्थ ठरलेल्या कामगारांना 30 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. गरज भासल्यास एअर ॲम्बुलन्सच्या माध्यमातून त्यांना उच्च दर्जाच्या रुग्णालयात हलवले जाणार आहे.
पीडित कुटुंबातील सदस्यांना नोकरीची हमी-
मृत तसेच गंभीर जखमी कामगारांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार टिकून राहील.
घटनास्थळी बावनकुळे यांच्यासह प्रशासनाची तातडीने भेट-
बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, फायर व इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर यांच्यासह घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. कंपनीच्या मालकांसोबतही चर्चा करण्यात आली आणि मदतीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात आले.
चौकशी व कारवाईचे निर्देश-
या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना टळाव्यात यासाठी कंपनीने सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
एकात्मिक प्रयत्नांमुळे मदत आणि न्याय मिळणार-
या दुर्घटनेत सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कंपनी एकत्र येऊन पीडितांना तातडीने मदत मिळवून देत आहेत. ही एक संवेदनशील आणि जबाबदार भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.ही घटना दुर्दैवी असून पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणा सजग राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.