नागपूर: उमरेड येथील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम फॉईल तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या कामगारांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयांनी घेतली. मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पीडितांची विचारपूस करताना त्यांनी डॉक्टरांशी रुग्णांच्या प्रकृतीबद्दल सविस्तर चर्चा केली आणि उपचारांबाबतची माहिती घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर अनेक जण गंभीर भाजलेले असून त्यांच्या उपचारासाठी स्किन बँकेची अत्यंत गरज आहे. त्यामुळे नागपुरात अत्याधुनिक स्किन बँक तातडीने स्थापन करण्यात यावी,असा आदेश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना दिला आहे.
फडणवीस म्हणाले की, या जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही. आवश्यक असेल तर रुग्णांना एअर अॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने ऐरोली येथील खास बर्न उपचार रुग्णालयात हलवण्यात येईल.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचली होती. या दुर्घटनेत सुमारे ७ ते ८ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.फडणवीस यांनी जखमींच्या नातेवाइकांशी संवाद साधताना त्यांना मानसिक आधार दिला आणि सरकारतर्फे सर्वतोपरी मदत दिली जाईल, याचे आश्वासनही दिले.