नागपूर – नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी भागातील ॲल्युमिनियम फॉइल तयार करणाऱ्या फॅक्टरीत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये निखिल निहारे (२४), निखिल शेंडे (२५), अभिषेक जांगड (२०), पीयूष वासुदेव दुर्गे (२१) आणि सचिन पुरुषोत्तम मसराम (२६) यांचा समावेश आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना सांगितले की, दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या तीन जणांचे मृतदेह शनिवारी सापडले. एकूण ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”
स्फोट फॅक्टरीच्या पॉलिश्ड ट्यूबिंग युनिटमध्ये झाला. त्या वेळी एकूण ८७ कामगार आत उपस्थित होते. स्फोटानंतर लागलेली आग अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
पोद्दार पुढे म्हणाले, आगीच्या तीव्रतेमुळे फॅक्टरीच्या संबंधित भागात प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले आह. आग पूर्णपणे विझवल्यानंतरच तपासकार्य सुरू करता येईल.
या दुर्घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदत व बचाव कार्य उशिरापर्यंत सुरू होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.