नागपूर : उमरेड एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणात मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. मंगळवारी सकाळी गंभीर जखमी करण तुकाराम शेंडे (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, या स्फोटात करणचा मोठा भाऊ निखिल तुकाराम शेंडे (वय २५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
११ एप्रिलचा भीषण स्फोट
११ एप्रिल रोजी उमरेड येथील एमएमपी कंपनीत स्फोट झाला होता. या भीषण दुर्घटनेत १३ कामगार जखमी झाले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता, तर दोघांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. करणचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. उर्वरित आठ मजुरांवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती स्थिर असून एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
गावात शोककळा पसरली –
या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोठा भाऊ निखिलचा मृत्यू ११ एप्रिल रोजीच झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी करणच्या उपचारासाठी कुटुंब प्रयत्नशील होते. मात्र, मंगळवारी त्याचाही मृत्यू झाल्याची बातमी गोंडबोरी गावात पोहोचल्यावर गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन तरुण मुलांच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.या दुर्घटनेनंतर कारखान्याकडून योग्य ती काळजी घेतली जात नव्हती, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.