– स्वातंत्र्य वर्धापन दिन कार्यक्रम आयोजनासाठी विविध विभागांची बैठक : महापौरांच्या नेतृत्वात गठीत होणार समिती
नागपूर: देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. अनेकजण शहीद झाले. या देशाला स्वातंत्र्य संग्रामाचा ज्वाज्वल्य इतिहास आहे. यंदा संपूर्ण देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करणार आहे. यानिमित्ताने नव्या पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास सांगण्यासाठी आणि प्रत्येकाच्या नसानसांत देशभक्ती भिनवण्यासाठी ‘आझादी-७५’ अंतर्गत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभर स्वातंत्र्याचा जागर करा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आणि वर्षभर शहरातील केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, निमशासकीय विभाग, संस्था, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभाग आणि सहकार्यातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या हेतूने रविवारी (ता. ८) आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत अध्यक्षस्थानावरून ना. नितीन गडकरी बोलत होते. बैठकीला महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी विमला आर., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, मनपाचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने, मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, नागपूर मेट्रोचे उपमहाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मार्गदर्शन करताना ना. नितीन गडकरी पुढे म्हणाले, युवा पिढीला स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळावी यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध विभाग आणि संस्थांच्या माध्यमातून एकत्रितपणे व्हायला हवे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून स्वातंत्र्य समराचे स्मरण व्हावे, असे नियोजन करण्यात यावे. तेलंगखेडी उद्यानाजवळील फुटाळा तलावामध्ये म्युझिकल फाऊंटेन उभारण्यात येत आहे. यासाठी ‘आझादी-७५’ची संहिता तयार करून देशभक्ती चेतविणारा ‘लाईट ॲण्ड म्युझिक’ शो ने त्या ‘म्युझिकल फाऊंटेन’चे उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करताना कोव्हिड नियमावलीच्या मर्यादा आहेत. ते पुढेही कायम असतील तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, तंत्रज्ञानाचा उपयोग करून कार्यक्रम करावे लागतील. प्रत्येकाला घरबसल्या त्याचा आनंद घेता येईल. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पूर्वी गायकांची उत्तम चमू होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सायन उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी या चमूने गायन केले होते. अशा गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक गीतस्पर्धा घ्यावी आणि त्यांना अवॉर्ड द्यावा, अशी संकल्पनाही ना. नितीन गडकरी यांनी यावेळी मांडली. या संपूर्ण आयोजनाला आपले सहकार्य आणि सहभाग राहील. मात्र, त्याचे नेतृत्व महापौर दयाशंकर तिवारी यांनी करावे. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असलेली कोअर टीम तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, यासंदर्भात आपण त्यांच्याशी बोलू, असेही त्यांनी सांगितले.
विभागांनी, संस्थांनी लेखी सूचना द्याव्यात : महापौर
बैठकीच्या प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘आझादी-७५’ मागील पार्श्वभूमी सांगितली. १४ ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्थात वर्षभर विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. नागपूर शहरातील लोकांनी याचे आयोजन करावे, ही त्यामागील संकल्पना आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे ७५ हेल्थ पोस्ट साकारण्यात येत आहे. मनपा शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना पीएमटी, जेईई आणि एनडीएच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ‘सुपर ७५’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ७५ महाविद्यालयातील प्रत्येकी पाच असे ३७५ विद्यार्थी शहरातील ७५ पुतळ्यांची देखभाल करणार आहे. ७५ मैदानांचे रुपांतर ‘ऑक्सिजन झोन’मध्ये करण्यात येत आहे. असे काही अभिनव प्रकल्प इतर विभाग, संस्थांनीही राबवावे. शिवाय सर्वांनी एकत्रित येऊन वर्षभर कार्यक्रम राबवायचे ठरविले तरी प्रत्येक १५ दिवसांत एक कार्यक्रम देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. आयोजनासंदर्भात लेखी सूचना पुढील तीन ते चार दिवसांत महापौर कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच आयोजन समिती तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विविध विभागांचा सहभाग
आभासी पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत विविध विभागाचे, संस्थांचे ८० पदाधिकारी, अधिकारी, प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारत संचार निगम लि., वेस्टर्न कोलफिल्डस् लिमिटेड, मॅगनीज ओअर इंडिया लिमिटेङ, माफसू, एनटीपीसी, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर मेट्रो, जीपीओ, व्हेटरनरी कॉलेज, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे यांच्यासह असोशिएशन, संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.