नागपूर: आरोग्याचा प्रश्न कोणाला कधी उद्भवेल, हे सांगता येत नाही. विमा असला तरी वेळेवर त्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा काढण्याचे विचाराधीन आहे. त्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्यासह बैठकीला उपसभापती प्रमोद कौरती, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, समितीचे सदस्य लखन येरावार, विशाखा बांते, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, नगरसेविका नसीब बानो इब्राहीम खान, आरोग्य अधिकारी (एम.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, यांत्रिकी अभियंता राजेश गुरुमुले उपस्थित होते.
धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या ठरावानुसार पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस विम्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत चर्चेला आला. हा विषय महत्त्वाचा असून यावर सर्वसंमती असेल, असे मत रूपा रॉय यांनी मांडले. हा विमा काढताना प्रीमियमच्या रक्कमेमध्ये काही वाटा मनपाचा, काही वाटा पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनाचा तर काही वाटा कर्मचाऱ्यांचा राहील, अशी सूचना सभापती मनोज चापले व अन्य सदस्यांनी मांडली. यासंदर्भात समाजकल्याण विभागाची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून ही योजना राबविता येईल, असे मत डॉ. अनिल चिव्हाणे यांनी मांडले. आलेल्या सूचनेसह कॅशलेस विम्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्याचे आदेश सभापती श्री. चापले यांनी दिले.
डेंग्यू आजारासंदर्भात मनपातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. डेंग्यू संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असल्याची माहिती हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. दोन फॉगींग मशीनद्वारे नियमित फवारणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर विभाग भर देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आशीनगर झोनकडून आलेल्या तक्रारीवर झालेल्या ठरावानुसार नागपूर शहरातील सफाई कामात कामचुकार तसेच सफाई कामगारांच्या गैरहजरीबाबत चर्चा करण्यात आली. या तक्रारींची शहानिशा करून असा काही प्रकार होत नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले. हजेरी घेणारे जमादार किंवा एस.आय. जर हजेरी घेताना उपस्थित राहात नसेल तर त्याची चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल मांडण्यात येईल, असेही डॉ. दासरवार यांनी सांगितले. अन्य काही विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. ड्रेनेज हा विषय नागपूर महानगरपालिकेत आरोग्य विभागाकडे असून तो लोककर्म विभागाकडे वर्ग करण्यात यावा, यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले असून आयुक्त याबाबत सकारात्मक असल्याची माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली.
बैठकीला दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.