मुंबई: देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हुकुमशाही सरकारविरोधातील लढा काँग्रेस कार्यकर्ते अधिक तीव्र करतील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. भाई जगताप यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३३ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. आ. भाई जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधीत करताना जगताप म्हणाले की, काँग्रेसने देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. स्वातंत्र्यानंतर या देशात लोकशाही रूजवली, पण आज सत्तेत असलेले लोक देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करित आहेत. लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांची असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करावा असे आवाहन आ. भाई जगताप यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजन भोसले, पृथ्वीराज साठे,यशवंत हाप्पे, सचिव सय्यद जिशान अहमद, राजाराम देशमुख यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील टिळक भवनसह राज्यभरात काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.