नागपूर : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार आणि आयोगावर सडकून टीका केली. नागपूर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहे.
कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो. त्यावेळी तिथे पोट निवडणूक घेतली पाहिजे. पण, केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही, त्यामुळे न्यायालयाने यांना फटकारले आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपा सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटविण्याचे प्रयत्न-
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत सरकार ओबीसींवर अन्याय करत असल्याचा आरोप केला. एकीकडे सरकार मराठ्यांना आरक्षण देणार, असे सांगत आहे. तर दुसरीकडे भुजबळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका मांडत आहेत. या पद्धतीने ओबीसीविरुद्ध मराठा असा वाद लावून महाराष्ट्र पेटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामागे भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचेही भुजबळ म्हणाल्याचे पटोले म्हणाले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान –
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. . दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे कळत होते, पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही. या लोकांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.