नागपूर : स्वामित्व योजने अंतर्गत प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत नागपूर विभागातील 376 गावांमधील घरमालकांना (मालमत्ता कार्ड) सनद वाटप होणार आहे. लाभार्थ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील 376 गावांमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप करण्यात येणार असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 84 गावे, भंडारा जिल्ह्यातील 42 गावे, गोंदिया जिल्ह्यातील 50 गावे, वर्धा जिल्ह्यातील 55 गावे, चंद्रपूर जिल्ह्यातील 81 गावे तर गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांचा समावेश आहे. विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी आदी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामूनि, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, जिल्हा अधिक्षक अभय जोशी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
स्वामित्व योजनेचे फायदे
अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे.
सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील.
मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी
कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा
जमीनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण
मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ
गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना